औरंगाबाद : एकीकडे नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची लगीनघाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्रावरच कोरोनाचे आक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे तयारी दणक्यात आणि काटेकोर नियोजनात सुरू असली तरी साहित्य संमेलनावर आता मात्र कोरोनाचे सावट घोंगावू पाहत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशी सर्व परिस्थिती असताना साहित्य संमेलनाचे काय, असा प्रश्न साहित्यप्रेमींकडून विचारला जात आहे.
लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांना जशी ५० लोकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे, तशी मर्यादा आता साहित्य संमेलनावरही येणार का, जर मर्यादा आलीच तर साहित्य संमेलनांच्या केवळ व्यासपीठावरील व्यक्तींचीच गर्दी पाहता ५० लोकांत साहित्य संमेलन होणे शक्य आहे का, अशा अनेक चर्चांना सध्या साहित्य वर्तुळात ऊत आला आहे. नियोजनानुसार मार्चच्या अखेरीस साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत परिस्थिती आटोक्यातही येऊ शकते, असेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्यातरी साहित्य संमेलनाच्या बाबतीत सगळेच अनिश्चिततेचे वातावरण झाले आहे.
चौकट :
शासनाच्या आदेशानुसार निर्णय घेऊ
साहित्य संमेलन घ्यायचे की नाही, साहित्य संमेलन झाले तर किती लोकांची उपस्थिती असेल, हा सगळा निर्णय आता शासन आदेशावर अवलंबून आहे. मार्च महिन्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून शासनाकडून साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत जो आदेश येईल, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ.
- दादा गोरे
कार्यवाह, अ. भा. साहित्य महामंडळ
चौकट :
मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यक्रम रद्द
दि. २४ फेब्रुवारी रोजी होणारा डॉ. सुधीर रसाळ यांचा सत्कार, दि. २७ फेब्रुवारी रोजी कविता दिनानिमित्त होणारा काव्य पुरस्कार समारंभ, दि. ३ मार्च रोजी डॉ. प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा हे सर्व मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे होणारे कार्यक्रम कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रद्द करण्यात आले आहेत.