- सोमनाथ खताळबीड : कुछ लोग आये और नींद में ही उठा के अस्पताल में ले गये. कोरोना के बारे में सुना था. इसलिए दिल मे बहुत डर था. मौत कुछ कदम आगे थी, लेकिन अब मैं ठीकठाक हूँ. इसीलिए मुझे बडी खुशी हो रही है... हे शब्द आहेत कोरोनामुक्त होऊन परतलेल्या पिंपळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीचे. अहमदनगरच्या रुग्णालयातील कक्ष सेवकापासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांनीच आपल्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणल्याची भावना या व्यक्तीने व्यक्त केली. शुक्रवारी बीड जिल्ह्यात आल्यावर ‘लोकमत’ने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने १८ दिवसांचा रुग्णालयातील मुक्कामाचा उलगडा केला.
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील ६३ वर्षीय व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यात गेला होता. तेथेच त्याचा कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आला. त्यानंतर ते दुचाकीवरुन गावी परतले होते. ही माहिती आरोग्य विभागाला समजताच त्यांनी त्याला अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ७ एप्रिल रोजी त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यानंतर बीड व अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हाच रुग्ण बीड जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण होता. १४ दिवसानंतर त्याचे पुन्हा दोनवेळा थ्रोट स्वॅब घेतले असता, दोन्हीही निगेटिव्ह आले. त्यामुळे तो कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केले. शुक्रवारी सकाळी त्याला रुग्णालयातून सुटी दिल्यानंतर दुपारी तो पिंपळा या गावी परतला. त्यानंतर त्याच्याशी ‘लोकमत’ने फोनवरुन संपर्क साधला. यावेळी त्याने ७ ते २४ एप्रिल दरम्यानचा रुग्णालयातील सर्व प्रवास उलगडला.
तो म्हणतो, मला नेमकीच झोप लागली होती. एवढ्यात मला उठवण्यात आले. एका रुग्णवाहिकेतून अहमदनगरला नेले. तेथे दवाखान्यात दाखल केले. का दाखल केले हे सुरुवातीला माहित नव्हते. नंतर अंदाज काढून कोरोनाची माहिती मिळाली. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी काळजी घेत होते. औषधोपचार करण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्थाही त्यांनीच केली होती. कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते माझी काळजी घेत होते, असे त्यांनी सांगितले. मृत्यू काही पावलांवर असताना डॉक्टर, कर्मचाºयांनी त्यांना तेथून परत आणले. त्यामुळे आरोग्य विभागाचे कौतूक होत आहे.
हॉस्पिटलमध्येच दररोज नमाज पठनमाझ्या प्रार्थना आणि धार्मिक पूजेला कोणीही बाधा आणली नाही. मी बाजूच्याच खोलीत जावून दररोज नमाज अदा करीत होतो. आता रोजा महिना सुरु होणार आहे. मी घरातूनच नमाज अदा करणार आहे.
कोरोना बहोत बेकार है १८ दिवस रुग्णालयातच राहून उपचार घेणाºया त्या व्यक्तीने अनेक आठवणी मनात साठविल्या आहेत. ‘कोरोना बहोत बेकार है’ असे म्हणत त्यांनी या विषाणूचे गांभीर्य सांगितले. आता मी घरी परतलो आहे. एवढ्या दिवस कोणाचाच संपर्क नव्हता. आता खुप फोन येत आहेत. गोळ्या खाल्या आहेत. थोडा आराम करतो. आता काही छोट्या छोट्या गोष्टी आठवत नाहीत. मी फोन ठेवतो, असे म्हणत त्यांनी फोन कट केला.
पिंपळासह ११ गावे १४ दिवस बंदकोरोनाचा रुग्ण आढळताच पिंपळासह परिसरातील ११ गावे प्रशासनाने बंद केली होती. गुरूवारी ते पुन्हा खुली केली. दररोज २६२० गावांतील १२ हजार ३४५ लोकांची चौकशी केली जात होती. १४ दिवसांत केवळ दोघांना लक्षणे जाणवली होती. त्यांचे स्वॅब घेतले असता ते देखी निगेटिव्ह आले होते. यासाठी ३० पथकांची नियूक्ती केली होती.