- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या औरंगाबाद येथील भावी नवरदेवाच्या संपर्कात आलेल्या अजिंठा येथील २८ लोकांचे स्वॅब अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज डोंगलीकर यांनी दिली. यात दोन्ही भावी वधू व जळगाव जिल्ह्यातील अटनगाव येथील भावी नवरदेवाचा समावेश आहे. तर त्या साखर पुड्याला हजर असलेले तब्बल २०० नागरिक अजिंठ्यात क्वांरटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे लग्ना आधीच सर्वांची वरात आरोग्य विभागाने काढल्याचे चित्र दिसत आहे.
अजिंठा येथे ७ जून रोजी दोन साखरपुडे झाले त्यात २०० लोकांच्या वर नागरिक उपस्थित होते. दोन दिवसानंतर साखर पुडा झालेला एक युवक औरंगाबाद येथे पॉझिटिव्ह आढळून आला. यामुळे अजिंठा येथे त्याच्या जवळून संपर्कात आलेल्या २८ लोकांचे स्वॅब आज घेण्यात आले. त्यांचा रिपोर्ट शनिवारी येईल. सर्व संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वांरटाईन करण्यात आले असल्याची माहिती डॉ.झवेरीया शेख यांनी दिली आहे. दरम्यान, ७ जून रोजी साखरपुड्यानंतर गुरुवारी ११ जून रोजी आणखी २ विवाह झाले. त्या विवाहात आज क्वारंटाईन केलेल्या कुटुंबाने हजेरी लावली होती अशी माहिती आहे. त्यामुळे अजिंठा गावात नागरिकांनी धास्ती घेतली असून सर्वांचे लक्ष येणाऱ्या अहवालाकडे आहे.
लग्नात नातेवाईकांची गर्दी वाढत आहे शासनाने लग्नात किमान ५० लोकांना परवानगी दिली आहे. मात्र ग्रामीण भागात याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने २०० च्या वर नागरिक साखरपुडा व लग्नाला हजेरी लावत आहे. यात रेड झोनमधील काही लोक येत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होत आहे. यामुळे रेड झोन मधील लोकांना ग्रामीण भागात येण्यास प्रतिबंध घालावा अशी मागणी यामुळे होत आहे.