औरंगाबाद : शहरात रविवारी आणखी २७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता ९२ झाली आहे.
औरंगाबादमध्ये शनिवारी एकाच दिवशी ३५ जण कोरोनामुक्त झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी आणखी २७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. यातील आठ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. यात नूर कॉलनी येथील दोन मुले, दोन महिला आणि एका पुरुषाने कोरोनावर मात केली. तर मुकुंदवाडी-संजयनगर, भीमनगर-भावसिंगपुरा आणि चिकलठाणा या भागांतील प्रत्येकी एक पुरुष कोरोनामुक्त झाले. या आठही रुग्णांना दुपारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले. मनपाच्या केंद्रात दाखल १९ जणही कोरोनामुक्त झाले.
दिवसभरात ५० रुग्णांची भर शहरात सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडली. दिवसभरातील आकडा ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली आहे. मागील तीन दिवसात शहरात शुक्रवारी १०० , शनिवारी ३० आणि रविवारी संध्याकाळपर्यंत ५० अशा १८० रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.