औरंगाबाद : मदनी चौक येथील ६५ वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला. हा शहरातील आतापर्यंतचा ३२ वा बळी ठरला आहे, असे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
१३ मे पासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. खाजगी लॅब मध्ये कोरोना पॉझिटिव्ह निदान झाल्यावर त्यांना घाटीत संदर्भित करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर अतीवदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोरोनामुळे झालेला न्यूमोनिया यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ गायकवाड यांनी कळवले आहे
दरम्यान, शहरात सोमवारी सकाळी आणखी ५९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०२१ झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांत पैठण गेट सब्जी मंडी (१), किराडपुरा (१), सेव्हन हिल कॉलनी (१), एन-६ सिडको (१), बायजीपुरा (१), रोशन नगर (१), न्याय नगर (३), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.२ (४), हुसेन कॉलनी (४), पुंडलिक नगर (२), हनुमान नगर (१), संजय नगर, गल्ली नं. पाच (१), हिमायत बाग, एन-१३ सिडको (१), मदनी चौक (२), सादाफ कॉलनी (१), सिल्क मील कॉलनी (८), मकसूद कॉलनी (६), जुना मोंढा (११), भवानी नगर (५), हिमायत बाग, जलाल कॉलनी (३), बेगमपुरा (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये २८ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे.