- राम शिनगारे औरंगाबाद : जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे आपल्याकडेही लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या सुट्यांच्या काळात सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका मुलाने कोरोना रुग्णांच्या जवळ न जात त्यांना औषधी, जेवण देईल, अशा रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटच्या निर्मितीसाठी त्याला अवघा १५०० रूपये एवढा नाममात्र खर्च आला आहे.
शहरातील गायकवाड ग्लोबल स्कूलमध्ये सातवीच्या वर्गात साई सुरेश रंगदाळ हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यांने लॉकडाऊनच्या सुट्याच्या काळात एक अभिनव उपक्रम राबविला आहे. त्याने ‘शौर्य १.००’ हा रोबोट तयार केला आहे. या रोबोटच्या निर्मितीसाठी त्याने ऑर्डिनो यूएनओ हा प्रोग्रामीक किबोर्ड वापरला आहे. त्याला ‘एच सी ०५ ब्ल्यू टुथ’ हे मॉड्यूल वापरले. हे मोड्यूल अॅन्ड्राईड मोबाईलशी कनेक्ट केले. मोबाईलमधून पाठविलेले सिग्नल्स ब्लू टुथच्या मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्याद्वारे रोबोटची ऑपरेटिंग करण्यात येत आहे. तसेच दोन ‘एल २९८ एन मोटार ड्रायव्हर’ वापरले आहेत. या रोबोटला चाकेही बसविण्यात आली असून, १८६५० ही रिर्चाजेंबल बॅटरी बसविली आहे. ही सर्व यंत्रणेला कमांड देण्यासाठी प्रोग्रामिक ‘ऑर्डिनो आयडीई सॉफ्टवेअर’ची वापरण्यात आली आहे. या सर्व यंत्रणेनेमुळे मोबाईल किंवा रिमोटच्या सहाय्याने या रोबोटचे संचलन करण्यात येत आहे. या रोबोटसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू लॉकडाऊनमध्ये ज्या उपलब्ध झाल्या, त्याच आहेत. मात्र या रोबोटची वाहून नेण्याची क्षमता सद्यस्थितीत एक किलो एवढी आहे. त्यात वाढ नक्कीच करता येते, असेही रोबोटचा निर्माता असलेला विद्यार्थी साई रंगदाळ हा सांगतो. या रोबोटच्या निर्मितीसाठी वडिल सुरेश रंगदाळ, आई माधुरी रंगदाळ आणि बहिण सिद्धी यांची मोलाची मदत झाली असून, हा रोबोट अवघ्या चार दिवसात बनविला असल्याचेही साई सांगतो.
रुग्णांना होऊ शकते मोलाची मदतकोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात जाण्यासाठी प्रत्येकाला भिती वाटत आहे. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टर, नर्स यांना जावे लागते. मात्र औषधी देणे, जेवण, पाणी देणे अशा किरकोळ कामासाठी त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना जावे लागू नये, यासाठी हा रोबोट बनविला आहे. या रोबोटच्या सहकार्याने एक किलोपर्यंतची कोणत्याही वस्तू कोरोनाबाधित रुग्णापर्यत पोहचविता येतात. त्याचे संचलन हे रिमोटच्या माध्यमातुन होत असल्यामुळे रुग्णाच्या जवळ जाण्याची गरजच निर्माण होत नाही, असाही दावा विद्यार्थी साई रंगदाळ हा करतो.
मुलाला कोणतेही गिफ्ट द्यायची असेल तर त्याला मी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून देतो. त्याला नेहमी काही ना काही नविन वस्तू तयार करण्याचा छंद आहे. यापूर्वीही त्याने मोबाईद्वारे घराचे दार उघडणे, लॉक लावणे, सायकल चालवतांना निर्माण होणाऱ्या उर्जेचा वापर करून हेड लाईट व इंडिकेटर लावणे, मोटारीवर चालणारा आकाश कंदिल तयार केले होते. यातुन त्यांची नाविन्यपूर्ण वस्तू तयार करण्याची रूची वाढत आहे. - सुरेश रंगदाळ, वडील