औरंगाबाद : शहरातील इंदिरानगर ( बायजीपुरा ) येथील ५५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सोमवारी (दि. २५) सायंकाळी ५.१५ वाजता उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीत त्या कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. या मृत्यूमुळे शहरातील एकूण मृतांची संख्या ५९ झाली आहे. शहरात मंगळवारी दिवसभरात २२ बाधितांची वाढ झाली असून एकूण तीन मृत्यू झाले आहेत.
कोरोना संशयीत म्हणून उपचार सुरु असतांना इंदिरानगर ( बायजीपुरा ) येथील ५५ वर्षीय महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. मधुमेह, श्वसनविकारासोबत कोव्हीडमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने कळवले आहे.
दरम्यान, शहरातील जयभीमनगर आणि जाधववाडी येथील कोरोनाबाधित वृद्धांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिली. जयभीमनगर येथील ७२ वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात २४ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच दिवशी रुग्णाला घाटीत संदर्भीत करण्यात आले. भरतीवेळीच रुग्णाची प्रकृती गंभीर होती. मधुमेह, बीपी आदी व्याधीसह तीव्र श्वसन विकारामुळे त्यांना कृत्रिम श्वास देण्यात आला होता. त्यांचा कोरोनामुळे २६ मे मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला.
जाधववाडी येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ मे रोजी घाटीच्या कोव्हिड वॉर्ड सहा मध्ये भरती करण्यात आले. छातीचा व मेंदूचा क्षयरोग आणि श्वसन विकाराने त्यांना ग्रासलेले होते. १९ मे रोजी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. प्रकृती गंभीर बनली. अखेर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
२२ बाधितांची वाढ; रुग्णसंख्या १३२७ शहरातील २२ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या १३२७ झाली. मंगळवारी जुना मोंढा- १, बायजीपुरा- १, रोहिदासपुरा-१, कांचनवाडी-१, भारतमातानगर (हडको)-१, नवीनवस्ती (जुनाबाजार )- ४, जुना हनुमाननगर-१, हनुमान चौक-१, न्यायनगर-१, कैलाशनगर-१, रामनगर-१, एन ८ (सिडको )-४, रोशन गेट-१, एन ११ (सुभाषचंद्र नगर)- १, पुंडलीक नगर-१, भवानीनगर -१, या भागात कोरानाबाधित आढळले आहेत. यामध्ये ११ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.