औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीतील ८० हजार कामगारांची अँटिजन टेस्ट करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. हा खर्च उद्योग संघटना मिळून करणार आहेत. पहिल्या टप्प्यात हा खर्च होणार असून, सगळ्या २ लाख कामगारांची अँटिजन टेस्ट करायची असेल, तर १० कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे.
शहरात मनपाकडून टेस्ट सुरू आहेत. याचा खर्च पालिकास्तरावर सुरू आहे. काही उद्योजकांमध्ये टेस्ट करून घेण्याची क्षमता आहे. उद्योजकांकडून मनपाला काय मदत होणार, याबाबत रविवारच्या बैठकीत चर्चा झाली. आठ तासांत १५० टेस्ट होणे शक्य आहे. तासाला २० टेस्ट होऊ शकतात. दर १० मिनिटांनी ३ कामगारांची टेस्ट होऊ शकेल. यामुळे गर्दी होणार नाही. या पद्धतीने उद्योजक कामगारांची अँटिजन टेस्ट करून घेणार आहेत. ४५० रुपयांऐवजी प्रतिकामगार ५०० रुपये देण्याची तयारी उद्योजकांनी दर्शविली. ज्या उद्योजकांकडे २० पेक्षा कमी कर्मचारी आहेत, ते जी रक्कम देतील, त्यावर जमवून घ्यावे लागेल. मनपाकडे सध्या ५० हजार टेस्ट कीट आहेत. त्यातील काही वापरल्या आहेत. त्यामुळे उद्योजक थेट कीट उत्पादक कंपनीकडूनच घेऊन कामगारांची टेस्ट करू शकतात. या टेस्टचा सगळा डाटा मनपाकडे देण्यात येईल.
मनपाने रिसोर्सेस वापरून कीट पुरविल्या तरी उद्योजक घेण्यास तयार आहेत. जिल्हा परिषदेकडे कीट उपलब्ध नाहीत. मनपा हद्दीत वाळूज व इतर उद्योग परिसर येत नाही. त्यामुळे अँटिजन कीट उत्पादक कंपनीशी उद्योजक संघटनांनी बोलणी सुरू केली आहे. २ लाख कीट खरेदी करण्याचे कंत्राट येथील उद्योजक संघटनांनी दिले, तर कीट स्वस्त उपलब्ध होऊ शकतात. याबाबत उद्योजक संघटना विचार करीत आहेत. कीट लवकर उपलब्ध होतील, या दिशेने नियोजन करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.