औरंगाबाद : शहरात सकाळी १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यानंतर दुपारी आणखी तीन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या ४९८ वर गेली आहे. यात सातारा परिसर, पाणचक्की आणि जुना बाजार येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
शहरात चार नव्या भागात कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आल्याने हॉटस्पॉटमध्ये भर पडली आहे. शुक्रवारी दिवसभरात शंभर रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी आणखी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात संजयनगर मुकुंदवाडी येथील ६, असिफिया कॉलनी १, कटकटगेट २, या जुन्या भागांसह बाबर कॉलनी ४, भवानीनगर जुना मोंढा २, सिल्कमील कॉलनी व रामनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. शनिवारी सकाळी आढळलेल्या १७ रुग्णांत १० महिलांसह ७ पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून दुपारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांत दोन पुरुष व एक महिला रुग्णांचा समावेश आहे.
शुक्रवारी सकाळी १८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बाधिताचा आकडा ३९६ झाला. त्यानंतर दोन तासातच ७२ एसआरपीएफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सायंकाळी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यात एक एसआरपीफ जवान तर आठ मुकुंदवाडी परिसरातील असे दिवसभरात एकुण ९९ रुग्ण आढळून आले. तर रात्री उशीरा घाटीत प्रसुत झालेल्या रोशनगेट परिसरातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दिवसभरात कोरोनाने शंभरी गाठली.