औरंगाबाद : महापालिकेकडून सध्या दररोज ७०० पर्यंत कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. त्यातून सव्वाशे ते दीडशे पॉझिटिव्ह रुग्ण सापडतात. १० जुलैपासून लावण्यात येणाऱ्या संचारबंदीत किमान ५० हजार नागरिकांची तपासणी करण्याचे लक्ष महापालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे. अत्याधुनिक अँटीजन पद्धतीने या टेस्ट करण्यात येणार आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात याचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
पाण्डेय यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पूर्वी ज्या वसाहतींमधून सर्वाधिक रुग्ण येत होते त्या भागात आता शोधूनही रुग्ण सापडणार नाहीत. नागरिकांमधील प्रतिकारशक्ती वाढली असावी, असे म्हणता येईल. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये १३ प्रकारचे कोरोना विषाणू आढळून येतात. काही विषाणू अत्यंत प्रखर, तर काही प्रभाव न टाकणारे असतात. कोरोनाची लढाई लढताना अनेक प्रकारचे अनुभव येत आहेत. रुग्णसंख्या वाढू लागली, अशी ओरड करण्यात येत आहे. रुग्ण सापडत आहेत ही चांगली बाब आहे. किमान यातून समूह संसर्गाचा धोका निर्माण होणार नाही. जेवढे रुग्ण सापडत आहेत त्यातील बरेच रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत, ही आनंदाची बाब आहे. कोरोना टेस्ट करणे वाईट बाब नाही.
अँटीजन टेस्टवर भर : अँटीजन टेस्ट बुधवारपासून सुरू होईल. या टेस्टसाठी मुंबईहून कीट मागविण्यात आले आहेत. एका किटची किंमत ५०० रुपयांपर्यंत आहे. अर्ध्या तासामध्ये टेस्टचा निकाल येतो. कीटसोबत लाळेचे नमुने घेण्याचे साहित्यसुद्धा उपलब्ध असते. सोबत एक सोल्युशन असते. त्यामध्ये लाळेचा नमुना मिक्स करून कीटवर दोन थेंब टाकायचे असतात. रिझल्ट वेळेवर न आल्यास आणखी १५ मिनिटे वाट बघितली जाते, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
सध्याच्या टेस्टसाठी तीन हजार रुपये खर्च : सध्या घेण्यात येणाऱ्या लाळेच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रती टेस्ट तीन हजार रुपये खर्च येत आहे. सध्या ज्या पद्धतीने लाळेचे नमुने घेण्यात येत आहेत, त्या पद्धतीनेच आणखी ५० हजार टेस्ट करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे.