औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत वाढलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश ‘रेड झोन’मध्ये झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र,रेड झोनमध्ये जिल्ह्याचा समावेश झाल्याने आता निर्बंध अधिक कठोर होतील. त्यातून कोरोनाला आळा बसण्यास निश्चितच मदत होईल,अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याची रेड, आॅरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवरून ही विभागणी करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तो जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. १५ पेक्षा कमी रुग्ण आहे, त्या जिल्ह्याचा समावेश आॅरेंज झोनमध्ये आहे. तर १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये गेलेल्या जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत आहे. त्यामुळे औरंगाबादेतही निर्बंध आता आणखी कठोर होण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रेड झोनमुळे किमान यापुढे तरी नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
औरंगाबाद का गेले रेड झोनमध्ये?ज्या जिल्ह्यांत १५ पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्या जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. औरंगाबादेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादचा समावेश रेड झोनमध्ये झाला. दहा दिवसांतच बदलली परिस्थिती औरंगाबादेत १ एप्रिलपर्यंत केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद होती. हा रुग्णही उपचारामुळे निगेटिव्ह झाला आहे. परंतु २ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत १९ पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. यात एका रुग्णांचा मृत्यूही झाला. ही विभागणी १ एप्रिल रोजी झाली असती तर औरंगाबाद निश्चित आॅरेंज झोनमध्ये असते.
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले...१५ पेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्याने औरंगाबाद रेड झोनमध्ये आले आहे. यामुळे औरंगाबादेत लॉकडाऊन ३० तारखेपर्यंत राहिल. जिल्ह्याची सिमा बंदच राहिल. कोणाला प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा रुग्णालयात दाखल सर्वच रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.