औरंगाबाद : कोरोना कामकाजाच्या नियंत्रणासाठी महापालिकेने उभारण्यात आलेल्या वॉररूममधील शिपायाला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. याशिवाय आस्थापना आणि घनकचरा विभागातील कर्मचारीही पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.
मागील चार महिन्यांपासून महापालिकेच्या सर्वच विभागांचे कामकाज ठप्प आहे. प्रत्येक विभागात मोजकेच कर्मचारी बोलावून अत्यावश्यक कामे करण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिक, राजकीय मंडळी, कंत्राटदार, पत्रकार यांची ये-जा चार महिन्यांपासून जवळपास बंद झाली आहे. मनपा मुख्यालयातील आरोग्य विभागात सर्व कर्मचारी सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत उपस्थित असतात.
मुख्यालयातच आरोग्य विभागाचे वेगवेगळे कक्ष उघडण्यात आले आहेत. कोरोना कामकाजाचे नियंत्रण केंद्रीय पद्धतीने व्हावे, कामाची नोंदणी एकाच ठिकाणी व्हावी, या उद्देशाने महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्थायी समिती सभापतींसाठी असलेल्या दालनात वॉर रूम सुरू केली. याठिकाणी नेमण्यात आलेला शिपाई पॉझिटिव्ह आढळून आल्याने कक्षात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत या कक्षात काम करणाऱ्या मंडळींचे लाळेचे नमुने घेण्यात आले नव्हते. वॉर रूममधील शिपायाच्या कुटुंबियांना कोरोणाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यालाही लागण झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तीन कर्मचारी निघाले पॉझिटिव्हमहापालिकेच्या आस्थापना विभागात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना तर घनकचरा विभागातील एका वरिष्ठ लिपिकाला कोरोनाची लागण झाल्याचे आज उघडकीस आले. त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या लाळेचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले.