औरंगाबाद : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल २९ भाविक सहभागी झाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आणि आरोग्य विभाग, मनपाची झोप उडाली. ही बाब चिंताजनक असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला.
दिल्लीत १३ ते १५ मार्चदरम्यान हा धार्मिक कार्यक्रम झाला होता. यात परदेशातून आणि देशभरातून भाविक सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्याना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आणि दिल्लीत एकच खळबळ उडाली. याच धार्मिक कार्यक्रमाचे आता औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास २९ भाविक याठिकाणी गेले होते. यासंदर्भात आरोग्य विभाग, महापालिका,जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनापर्यंत माहिती येऊन धडकली. या सर्व २९ जणांचा शोध घेण्यात आला. यात १४ जण शहरात आणि ८ ग्रामीण भागातील आहेत. तर ७ जण दिल्लीसह अन्य शहरात आहेत.
भाविक जिल्ह्यात परत येऊन १४ दिवस उलटले आहे. कोरोनाची लक्षणे १४ दिवसात समोर येतात. त्यामुळे फारसे घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. तरीही खबरदारी घेतली जात आहे. सर्वांशी फोनवर संपर्क झाला आहे. काहींच्या घरी भेटी देण्यात आल्या. जिल्हा रुग्णालयात काहींची तपासणीही झाली. कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. शहरातील भाविकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे, सर्वांची पुन्हा तपासणी केली जाईल, असे मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
फोनवर संपर्क, घरांना भेटी
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या २९ पैकी १४ जण शहरातील, ८ जण ग्रामीण भागातील आहेत. तर ७ जण औरंगाबादबाहेर आहेत. हे ७ जण दिल्ली, गुजरात, पंजाब, बुलढाणा येथे आहेत. त्यांनी औरंगाबादचा पत्ता दिलेला आहे. बहुतांश जणांशी फोनवर सम्पर्क झाला आहे. शहरातील १४ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सर्वांची प्रकृती ठीक आहे, घरांना भेटीही दिल्या, अशी माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
भाविकांची यादी मिळाली दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले होते. त्यांची यादी प्राप्त झाली असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले.
दिल्लीत महिनाभर राहिलेले ६ जण नेले तपासणीसाठी
दिल्लीत लग्नसमारंभासाठी गेलेले ६ जण एका भागात परत आल्याची माहिती मंगळवारी फोनवरून क्रांतिचौक पोलिसांना मिळाली. यावरून या ६ जनासह अन्य एका व्यक्तीस पोलिसांनी तपासणीसाठी रुग्णालयात नेले. या घटनेने याभागातील नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असल्याची चर्चा परिसरात होती. पोलिसांनी मात्र त्यास नकार दिला.