औरंगाबाद : जिल्ह्यातील पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती शासकीय रुग्णालय, घाटी येथील प्रशासनाने गुरुवारी दिली. यामुळे पाच मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना मृत्यूचा आकडा ३३५ झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढ झपाट्याने होत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे मृत्यूची संख्या सुद्धा वाढत जात आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. गुरुवारी उपचारादरम्यान, पैठण येथील ५६ वर्षीय पुरुष, गणेश कॉलनी येथील ८० वर्षीय वृद्ध महिला, सिल्लेखाना येथील ४२ वर्षीय पुरुष, अरिश कॉलनी येथील ७४ वर्षीय पुरुष, कन्नड, देवगाव रंगारी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली.
आज १६६ बाधितांची वाढ जिल्ह्यात गुरुवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आढळलेल्या रुग्णांत मनपा हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ६५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ९० पुरूष तर ७६ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७५०४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४०३३ रुग्ण बरे झालेले असून ३३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ३१३६ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.