औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या संशयावरून दाखल डॉक्टरचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला आणि सहकारी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा एकच निःश्वास घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत डॉक्टरच कोरोनाच्या संशयाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याची धक्कादायक बाब सोमवारी समोर आली होती.
रुग्णालयात कोरोना संशयित , 'ओपीडी' तील रुग्णांची तपासणी, उपचारात सदर डॉक्टर महत्वाची भूमिका निभावत होते. तीन दिवसांपूर्वी ते रुग्णालयातून लाळेचे नमुने घेऊन पुण्याला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना अचानक ताप आला आणि सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. ताप अधिक असल्याने त्यांना सोमवारी आयसोलेशन वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या संशयावरून त्यांच्या लाळेचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला.
या तपासणीचा अहवाल नेमका काय येतो, याकडे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी यांच्याकडे मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सहकारी अधिकारी घाटी रुग्णालयातून डॉक्टरचा अहवाल आल्याची माहिती घेऊन दाखल झाले. हा अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती मिळताच उपस्थित प्रत्येकाने काहीसा मोकळा श्वास घेतला. अहवाल निगेटिव्ह आल्याने डॉक्टरास रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचे डॉ.एस. व्ही.कुलकर्णी यांनी दिली.
'लोकमत'च्या वृत्ताची दखल
कोरोनाच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर उपचारासाठी दाखल असल्याचे वृत्त 'लोकमत' ने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचारणा झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी दिली.