औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या निदानापासून तर उपचारापर्यंत अनेक गोष्टींचा वापर होत आहे. स्टेराॅईड ही त्यातीलच एक बाब आहे. होय स्टेराॅईडच. हे नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतील. कारण, स्टेराॅईड घेतल्यामुळे अनेक खेळाडूंवर बंदी घातल्याचे सर्वांच्या ऐकण्यात असेल, पण योग्य प्रमाणात कोरोना रुग्णांसाठी हे वापरता येते. परंतु,रुग्ण लवकर बरा होईल, या विचारातून त्याचा प्रमाणापेक्षा अधिक वापर होत आहे. त्यातूनच रुग्णांना दुष्परिणामांना तोंड देण्याची वेळ ओढवत आहे. त्यावर अनावश्यक आणि अधिक प्रमाणात सिटी स्कॅनमुळे कर्करोगाला आमंत्रण मिळण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे रुग्णांमधील प्रतिकारशक्ती अतिप्रमाणात वाढते. एकप्रकारे ही प्रतिकारशक्ती अनियंत्रित असते. ही प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी स्टेराॅईडचा वापर केला जातो. त्यासाठी योग्य प्रमाणात डोस देणे गरजेचे असते. परंतु, अनेक ठिकाणी त्याचे प्रमाणापेक्षा अधिक डोस देण्याचा प्रकार होत आहेत. त्यातून रुग्णांची प्रतिकारशक्ती अधिक प्रमाणात दाबली जाते आणि त्यातून इतर संसर्गजन्य आजारांनाही तोंड देण्याची वेळ रुग्णांवर ओढवते. शिवाय, भविष्यातही रुग्णाला दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोना महामारीला गेल्या दीड वर्षांपासून औरंगाबादकर तोंड देत आहेत. परंतु, कोरोनासह आता रुग्णांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालयात असताना आणि रुग्णालयातून घरी गेल्यानंतरही रुग्णांची प्रकृती खालावण्याचे प्रकार होत आहेत. याला स्टेराॅईड कुठेतरी कारणीभूत असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनाच्या निदानासाठी सिटी स्कॅनद्वारे हाय रिझोल्युशन काम्प्युटराइज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी)केली जात आहे. कोरोनापूर्वी महिन्याला १८०० एचआरसीटी होत असे. परंतु, हे प्रमाण आता २४ हजारांवर गेले आहे. कोरोनाचा रुग्णांचा एचआरसीटी स्कोअर किती आहे, हे पाहण्यासाठी वारंवार तपासणीचे प्रकार होत आहेत. याबाबत तज्ज्ञांनी वेळीच काळजी घेत गरज असेल तरच सिटीस्कॅन करण्याचे आवाहन केले आहे.
एकदा सिटीस्कॅन करणे म्हणजे ८० ते १४० एक्सरेशासकीय आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांनी सांगितले की, एकदा सिटी स्कॅन काढणे म्हणजे जवळपास ८० ते १४० एक्सरे काढण्यासारखे आहे. एवढ्या सगळ्या एक्सरेतील रेडिएशन एकदाच होते. त्यामुळे अनावश्यक आणि गरजेपेक्षा जास्त सिटीस्कॅन काढणे म्हणजे कर्करोगाला आमंत्रण दिल्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले.
योग्य प्रमाणात डोस द्यावाकोरोनाच्या रुग्णांना स्टेराॅईड लो डोस दिला पाहिजे. प्रमाणापेक्षा अधिक डोस दिल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. शिवाय, जास्त प्रमाणात डोस दिल्याने काहीही फायदा होत नाही. रुग्णांमध्ये जे बुरशीजन्य आजार दिसत आहेत, ते स्टेराॅईडच्या परिणामांमुळेच दिसत आहेत. अनावश्यक सिटी स्कॅन, एचआरसीटी तपासणीचा शरीरावर आज ना उद्या परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून कर्करोगाला आमंत्रण मिळू शकते.- डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी
एक्सरेतून त्रोटक माहितीएक्सरेतून निदानाच्या संदर्भात त्रोटक माहिती मिळते. कारण, एचआरसीटी स्कोर १८ ते २० च्या पुढे असेल तरच एक्सरेतून निदान होते. त्यामुळे सिटी स्कॅन गोल्ड स्टँडर्ड आहे. रुग्णालयात दाखल होताना आणि बरे झाल्यानंतर सिटी स्कॅन झाला. एक सिटी स्कॅन अनेक एक्सरे काढल्याप्रमाणे आहे. पण त्यामुळे त्याचा कोणता दूरगामी दुष्परिणाम नाही.-डाॅ. ईक्बाल मिन्ने, रेडिओलाॅजिस्ट
प्रमाणापेक्षा अधिक स्टेराॅईडचे दुष्परिणाम-म्युकर मायकोसीस म्हणजे बुरशीजन्य आजाराचा धोका.- बुरशीच्या संसर्गामुळे डोळा गमावण्याची भीती.-प्रतिकारशक्ती दाबल्याने संधीसाधू आजार, अन्य संसर्गजन्य आजारांची लागण.-रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे.- रक्तदाब वाढणे.-मोतीबिंदूचा धोका.-ज्यांना मधुमेह नाही, त्यांना मधुमेह होणे.-हाडांवर परिणाम.
प्रमाणापेक्षा अधिक सिटी स्कॅनचे दुष्परिणाम-एकदा रेडिएशन घेणेही शरीरासाठी अपायकारक.- ३ पेक्षा अधिक वेळा सिटी स्कॅन करण्यातून ३ टक्के कर्करोगाचा धोका वाढतो.