औरंगाबाद : शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. जुन्या भागांसह नव्या भागांत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. शहर दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या टप्प्यात समूह संसर्ग होतो आणि शहरात त्याची सुरुवात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरात १५ मार्च रोजी पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निदान झाले होते, तेव्हा आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. हा रुग्ण परदेशातून शहरात परतलेला होता. आरोग्य विभाग, मनपा प्रशासनाने त्याच्या संपर्कातील ६०० वर लोकांची तपासणी केली; परंतु कोणीही कोरोनाबाधित आढळून आले नाही. पहिला पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन घरीही परतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, एप्रिलच्या प्रारंभी दोन नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी एकाच दिवशी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णांसह त्यानंतरच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांना बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचले. त्यानंतर आता एकाच वेळी अनेक रुग्ण आढळत आहेत. शिवाय एका भागापुरता कोरोना मर्यादित राहिला नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्याची भीती आहे.
कोरोनाचे टप्पे1. परदेशातून कोरोनाबाधित व्यक्ती देशात येणे, हा कोरोनाचा पहिला टप्पा होता. विमानतळावर परदेशी प्रवाशांची तपासणी झाली. या तपासणीनंतरही परदेशातून परतलेले नागरिक बाधित असल्याचे शहरात आढळून आले.2. दुसऱ्या टप्प्यात बाधित व्यक्तीकडून स्थानिक संपर्कातील व्यक्तीला बाधा होते. शहरातील नागरिक या टप्प्याला सामोरे गेले आहेत. 3. तिसऱ्या टप्प्यात स्थानिक बाधित व्यक्तीकडून समूहात विषाणूचा फैलाव होतो. सध्या या टप्प्यात शहर गेल्याची भीती व्यक्त होत आहे.4. चौथ्या टप्प्यात बाधित समूहाकडून पूर्ण प्रदेशात उद्रेक होतो. हा टप्पा सर्वात गंभीर मानला जातो.
तिसऱ्या टप्प्यात गेल्यासारखेशहर तिसऱ्या टप्प्यात गेल्यासारखे वाटत आहे. कारण आधी एकाच भागात रुग्ण आढळून येत होते. आता कोणत्याही भागातून रुग्ण येत आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येणे थांबले होते, तेथेही पुन्हा रुग्ण आढळत आहेत.- सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक