औरंगाबाद : केंद्रीय पथकाच्या शिफारसीनुसार जिल्ह्यात आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ‘सेरो सर्वेक्षण’ करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने अँटिबॉडीज तपासणी आणि सेरो सर्वेक्षणाबाबत बैठक झाली. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सर्वेक्षणातून शहरात, तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात येण्यास मदत होईल, तसेच प्रशासनाला सर्वेक्षणामुळे उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. यापूर्वी मराठवाड्यातील परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यात सर्वेक्षण झालेले आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शरीरात विकसित होत असलेल्या आयजीएम अँटिबॉडीज तपासण्यासाठी सर्वेक्षण करून निवडक चाचण्या केल्या जातील. त्या चाचण्यांची तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत होईल. ही प्रक्रिया दिल्लीच्या धर्तीवर राबविण्यात येईल.
मनपा आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले की, शहरातील ११५ वॉर्डांमध्ये पथके तैनात करून वेळेत सॅम्पल गोळा करून शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. या तपासणीच्या माध्यमातून शहरातील सर्व घटकांची रँडम पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे. जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. ज्योती बजाज, डॉ. नीता पाडळकर, डब्ल्यूएचओचे सदस्य डॉ. मुजीब सय्यद, डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. शोभा साळवे यांची उपस्थिती होती.
जिल्ह्याची तीन टप्प्यांत विभागणीजिल्ह्याची वाळूज-बजाज महानगर, महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण, अशा ३ विभागांत विभागणी तपासणीच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. या तपासणीसाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीने घटकांची निवड करण्यात येऊन वैज्ञानिक पद्धतीने तपासणीसह अभ्यास करण्यात येणार आहे. घाटीच्या इन्स्टिट्यूशनल इथिक्स कमिटीच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी लागणारे सॅम्पल जिल्हा परिषद, महापालिका एकत्रितपणे प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविणार आहे.