वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने शनिवारी ४ जुलैपासून वाळूज उद्योगनगरीत ९ दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात येत आहे. यातून कारखाने, दूध पुरवठा, रुग्णालये व औषधी दुकानांना मोकळीक देण्यात आली असून, इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जातील.
बजाजनगर, पंढरपूर, सिडको वाळूज महानगर, वाळूज याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बजाजनगर या कामगार वसाहतीत कोरोनाचा उद्रेक झाला असून, अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिसरातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ४ ते १२ जुलैदरम्यान वाळूज महानगर परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाळूज उद्योगनगरीतील बजाजनगर, वडगाव, पंढरपूर, जोगेश्वरी, तीसगाव, सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, साजापूर, साऊथ सिटी याठिकाणी संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. संचारबंदीसंदर्भात पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने दोन दिवसांपासून परिसरात जनजागृती केली जात आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणारे नागरिक व वाहनधारकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.
कारखाने सुरूच राहणारशनिवारपासून सुरू होत असलेल्या संचारबंदीतून औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना वगळण्यात आले आहे. सर्व प्रकाराचे सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा, सण व उत्सव साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उद्योजकांना कमीत कमी मनुष्यबळाच्या मदतीने कारखान्यातील कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्योग सुरू ठेवणा-या कंपनीतील कामगार, अधिकारी व उद्योजकांना कंपनीत ये-जा करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून पास वितरित करण्यात आले आहेत.