औरंगाबाद: शहरातील काही भागात मागील १० दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. यामुळे खबरदारी म्हणून जास्त रुग्ण आढळून आलेल्या ९ भागातील सर्व बँका बुधवार २९ एप्रिल ते ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत तर बाकीच्या भागातील बँका सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत म्हणजे २ तास सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे किलेअर्क, नूर कॉलनी, समतानगर, हिलाल कॉलनी, आसिफिया कॉलनी, किराडपुरा, बिस्मिल्ला कॉलनी, भीमनगर व बायजीपुरा या ९ भागात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण लक्षात घेता त्या परिसरातील सर्व बँका पुढील ५ दिवस बँद राहणार आहेत. तर शहरातील बाकीच्या भागातील बँका फक्त सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यानच सुरू राहतील. हे आदेश पुढील ३ मेपर्यंत लागू राहाणार आहे. यात शुक्रवारी १ मे ( महाराष्ट्र दिन) व ३ मे रोजी रविवार असल्याने हे दोन दिवस सुटीच आहे. बँकांच्या बदललेल्या वेळ संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी बँकांना दिले, अशी माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली.
हॉटस्पॉटमधील बँका बंदच राहणारजिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ९ भागात बँका बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या भागात ३ ते ४ बँका आहेत. पण तो भाग ज्या आसपासच्या भागातील बँकशी जोडल्या गेला आहे. त्या भागातील मिळून ५० शाखा आहेत. असे बँक कर्मचाऱ्याने सांगितले