औरंगाबाद - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये दारू दुकानात चोऱ्या होत आहेत. अशाच एका घटनेत चोरट्यानी बीअर बार फोडून सुमारे दिड लाखाचा माल लंपास केला. जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपूलाजवळ शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, सेव्हन हिल पुलाजवळ दिलीप सिताराम शिंदे यांच्या मालकीचे देवदास बिअर बार आहे लॉकडाउन सुरू झाल्यापासून शासनाच्या आदेशानुसार त्यांचे हॉटेल बंद आहेत. हॉटेलच्या सुरक्षेसाठी त्यांनी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्याचे चित्रण त्यांच्या मोबाईलवर पाहण्याची सोय केली आहे. २४ रोजी सकाळी ते झोपेतून उठले तेंव्हा त्यांनी हॉटेलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पाहिले असता तीन अनोळखी चोरट्यानी कॅमेऱ्याची दिशा छ्ताकडे केल्याचे दिसले. संशय आल्याने त्यांनी लगेच हॉटेलवर धाव घेतली असता हॉटेलचे दोन्ही शटर उचकटून आणि एक कुलूप तोडून चोरी केल्याचे नजरेस पडले. या घटनेची माहिती सिडको पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला . चोरट्यानी १ लाख ४३ हजार ३५० रूपये किमतीचा विदेशी दारूसाठा चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. याविषयी दिलीप शिंदे यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरिक्षक बाळासाहेब आहेर तपास करीत आहेत .