औरंगाबाद : शहरातील सर्व रुग्णालयांनी आपल्या खाटा आणि सुविधांच्या क्षमतांमध्ये जास्तीत जास्त वाढ करणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी दिला. खाजगी हॉस्पिटल्सलची बेडची संख्या आणि आयसीयूची यापुढे अचानक तपासणी करणार असल्याचेही केंद्रेकर यांनी स्पष्ट केले.
शासकीय रुग्णालयांसह सर्व खाजगी रुग्णालयांनी जास्त संख्येने खाटा आणि उपचार सुविधांमध्ये तत्परतेने वाढ करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी रुग्णालयातील उपचार सुविधांबाबतच्या, तसेच मेडिकल टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते. केंद्रेकर म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शासकीय रुग्णालयांसोबत सर्व खासगी डॉक्टर्स, रुग्णालयांना सहकार्यच करावे लागेल. क्षमता वाढीसाठी स्वत:हून पुढाकार घेत कोविड रुग्णालय म्हणून अधिक योगदान द्यावेच लागेल. धूत, एमजीएम यांच्याप्रमाणे बजाज, हेडगेवार या आणि त्यांच्यासारख्या मोठ्या रुग्णालयांनी अतिरिक्त शंभर, दोनशेपेक्षा अधिक संख्येने उपचार सुविधा उभारावी.
कोणत्या हॉस्पिटल्सची किती क्षमता असावी :- घाटीमध्ये अतिरिक्त ४०० खाटांपर्यंत क्षमता करा - जिल्हा रुग्णालयातही ३०० खाटांची सुविधा वाढवा. - एमजीएमने ५५० पर्यंत खाटांमध्ये वाढ करावी.- धूत हॉस्पिटलने १५० खाटांपर्यंत वाढ करावी.- डॉ.हेडगेवार रुग्णालयाने २०० पर्यंत वाढ करावी.- बजाज हॉस्पिटलने १०० खाटांची वाढ करावी.- येत्या आठ दिवसांत सदरील अतिरिक्त बेड वाढवावेत.