- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : गरोदरपणात कोरोनाची लागण झाली तरीही सिझेरियन करण्याची गरज नाही. नैसर्गिक प्रसूती शक्य आहे. कोरोना स्टेज-१ मध्ये असेल तर प्रसूतीवर कोणताही परिणाम होत नाही. याशिवाय स्टेज २ आणि ३ मधील गरोदरमातांचीही प्रसूती सुकर झाल्याचे घाटीत झालेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ३ मे ते ३ जूनदरम्यान केलेल्या ५४ कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एक संशोधन निबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा कोरोना आणि प्रसूती याविषयी कोणतीही गाईडलाईन नव्हती. यांसदर्भात अन्य देशांतील अभ्यासावर अवलंबून राहावे लागत होते. या सगळ्या परिस्थितीत घाटीत झालेला अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ५४ गरोदर महिलांपैकी ४२ महिलांत कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. उर्वरित महिलांत खोकला, दम , ताप लक्षणे होती. एकीला हृदयविकार, २ महिलांना थॉयरॉईड, ९ महिलांना स्थूलपणा होता. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. विजय कल्याणकर, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. संजय पगारे, डॉ. रूपाली गायकवाड, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. ज्योती बजाज, डॉ. निशा झा यांनी हा अभ्यास केला आहे.
या बाबी आल्या समोर01 > गरोदरपणात आईकडून शिशूला कोरोनाचे संक्रमण होत नाही.02 > गरोदरपणात इतर विषाणू उदा. कावीळ, फ्लू यांचा प्रादुर्भाव तीव्र होतो; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव तीव्र होत नाही.03 > सिझेरियनची गरज नाही, नैसर्गिक प्रसूती होऊ शकते.04 > कोरोना असल्याने आईला बाळापासून दूर ठेवण्याची गरज नाही.05 > योग्य खबरदारी घेऊन आई बाळाला स्तनपान करू शकते.
प्रसूतीनंतर स्टेज-४ मधील महिलेचा मृत्यूकोरोनाच्या स्टेज-४ मध्ये गेलेल्या महिलेचा प्रसूतीनंतर ९ व्या दिवशी मृत्यू झाला. २ महिला या स्टेज-२ आणि एक स्टेज-३ मध्ये होत्या. उर्वरित ५० महिला स्टेज-१ मध्ये होत्या. कंटेन्मेंट झोनमधील या सर्व गरोदरमातांचा शोध घेलता होता. लक्षणे कमी असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळाला, असे श्रीनिवास गडप्पा म्हणाले.
प्रसूतीनंतर पाचव्या दिवशी २ शिशू पॉझिटिव्हप्रसूतीनंतर पाचव्या दिवशी २ शिशूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित शिशूंना लागण झाली नाही.
५४ महिलांची प्रसूती स्थिती :२६ महिलांची नैसर्गिक प्रसूती.११ महिलांची सिझेरियन प्रसूती.३ महिलांचा नैसर्गिक गर्भपात.एका महिलेच्या गर्भनलिकेत गर्भ असल्याने शस्त्रक्रिया.१३ महिला गरोदर. कोरोनामुक्त, प्रसूतीपूर्व नियमित तपासणी सुरू.