- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : दर एक लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक कोरोना टेस्ट करण्यात औरंगाबाद शहर राज्यात अग्रेसर आहे. एक लाख लोकसंख्येमागे औरंगाबादमध्ये ७४२३ कोरोना टेस्ट झाल्या आहेत. महापालिकेतर्फे आतापर्यंत ८९ हजार ८२ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून लवकरच कोरोना टेस्टचा एक लाखाचा आकडा गाठणार आहे.
महापालिकेने आधीपासूनच रुग्ण शोधणे, तपासणी करणे आणि उपचार करणे या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर दिला. या उपक्रमावर टीकेची झोडसुद्धा उठविण्यात आली. टीकाकारांची कोणतीही परवा न करता महापालिकेने आपले काम सुरूच ठेवले.
जुलै महिन्यात कोरोना अँटिजन कीटद्वारे टेस्ट सुरू झाली आणि महापालिकेकडून कोरोना टेस्ट करण्याचा वेग वाढला. यामुळे आता औरंगाबाद हे राज्यात दहा लाख लोकसंख्येच्या मागे ७४२३५ आणि एक लाख लोकसंख्येमागे ७४२३ इतक्या कोरोना टेस्ट करणारे शहर झाले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या बारा लाख आहे. या लोकसंख्येमधील ८९ हजार नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या. राज्यातील कोणत्याही शहरात दहा लाख लोकसंख्येमागे एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट झाल्या नाहीत.
कालपर्यंत मनपाची टीम तपासणीसाठी आली म्हणताच नागरिक घराला कुलूप लावून दुसरीकडे राहण्यास निघून जात असत. आता तपासणीसाठी मनपांच्या शिबिरांमध्ये अक्षरश: रांगा लागत आहेत. हा सकारात्मक बदल मनपाने घडवून आणला आहे. शहरात समूह संसर्गाचा धोका निर्माण झालेला असताना पाण्डेय यांनी ठाकरे यांच्या सूचनेवरून शहरात अत्याधुनिक अँटिजन टेस्टला सुरुवात केली. यामुळे शहरात कोरोना टेस्टने नवीन उच्चांक गाठला.
१२०० आरोग्य कर्मचाऱ्यांची फौजमहापालिकेच्या वेगवेगळ्या कोविड सेंटरवर सध्या साडेचार हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची १२०० कर्मचाऱ्यांची फौज दिवस-रात्र झटत आहे.
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही महापालिकेच्या या कार्याची दखल घेत प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांचे टष्ट्वीट करून कौतुक केले आहे.
४००० कर्मचारी कोविडसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महापालिकेतील ९० टक्के कर्मचारी कोविडच्या कामासाठी नेमण्यात आले आहेत. ३ हजार ५०० कर्मचारी, अधिकारी दिवस-रात्र रुग्णांना आणि रुग्ण शोधण्याच्या कामात मग्न आहेत. जेवण, कंटेन्मेंट झोनमध्ये पत्रे लावणे आदी छोटी-छोटी कामे महापालिकेने कंत्राटदारांना दिली आहेत, त्यानंतरही पालिकेला कर्मचारी अपुरे पडत आहेत.
टेस्ट करण्याचा फायदा अँटिजन टेस्टचा फायदा आता दिसू लागला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर ताबडतोब उपचार सुरू आहेत. पूर्वी शंभरातील २८ नागरिक पॉझिटिव्ह येत होते, आता हेच प्रमाण ११ पर्यंत आले आहे. रुग्णशोध पूर्वी ६ टक्के होता, आता तो १६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्यूदर पूर्वी ६ टक्के होता, तो आता ३.८ पर्यंत आला आहे.-आस्तिकुमार पाण्डेय, मनपा प्रशासक