औरंगाबाद: शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता हे मंगळवारी रस्त्यावर उतरले. शहरातील विविध नाकाबंदी पॉईंटवर उभे राहून त्यांनी वाहनचालकाना थांबवून कुठे जात आहात आणि घराबाहेर पडण्याचे कारण काय, याविषयी विचारणा केली. यादरम्यान नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीची अमलबजावणी करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५९ नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले. एक अधिकारी आणि दहा पोलीस कर्मचारी प्रत्येक पॉइंटवर तैनात आहेत. असे असतांना रस्त्यावरील वाहनांची वर्दळ नजरेस पडते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी आज दुपारी अचानक शहरातील विविध चौकात जाऊन पाहणी केली. हर्सूल टी पॉईंट येथे त्यांनी अनेक वाहनचालकाना थांबवून कुठे जात आहात आणि घराबाहेर पडण्याची कारणे त्यांना विचारली. तेथे बहुतेक शेतकरी शेतमाल घेऊन शहरात आल्याचे आणि बॅंकेत जात आहे. किराणा सामान आणण्यासाठी जात असल्याचे दिसले. जिल्हा बंदीचे उल्लंघन करून वैद्यकीय कारणासाठी शहरात आलेल्या नागरीकाची गरज लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई न करण्यास सांगितले.
महावीर चौकात त्यांना दोन डॉक्टर विना ई पास नाशिक येथून शहरात आल्याचे आढळून आले. डॉक्टरांना ई पास ची आवश्यकता असल्याचे त्यांना माहिती नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. कडक उन्हामुळे उष्माघात टाळण्यासाठी नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी रोटेशननुसार आराम करावा अशी सूचना त्यांनी केली. नाकाबंदी पॉईंटच्या अधिकाऱ्यांनी याचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नियम मोडणाऱ्या कुणालाही सोडू नका असे निर्देश त्यांनी दिले.
विनाकारण फिराल तर कारवाईसंचारबंदीत रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे योग्य आणि समर्पक कारण असल्याचे दिसून आले. विनामास्क आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.- डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त