औरंगाबाद : कोरोना व्हायरस एका दिवसातही मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. एकाच दिवशी अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास धावपळ होऊ नये म्हणून औरंगाबाद महापालिकेसह सर्व शासकीय यंत्रणांनी चांगलीच कंबर कसली आहे. शहरात २,३२८ बेडची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये १२३ बेडची तयारी करण्यात आली. आतापर्यंत ९०८ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये १७ विदेशवारी केलेल्या नागरिकांचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात महापालिकेनेही जय्यत तयारी केली आहे. सध्या कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. एका खासगी महाविद्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा अहवाल देखील आता निगेटिव्ह आला. तसेच शहरातील सर्व संशयितांचे अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने शहरात शनिवारपर्यंत एकही संशयित रुग्ण नव्हता.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ९०८ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या ७२६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये ४२६ विद्यार्थ्यांचा, तर इतर ३०० जणांचा समावेश आहे. या सर्वांना १४ दिवस घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्हाभरात इतर १८२ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.
ते १७ जण होम क्वारंटाईन कामानिमित्त विदेशात गेलेल्या १७ नागरिकांना शहरात दाखल झाल्यानंतर त्वरित होम क्वारंटाईन करण्यात आले असून, त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. पुढील १४ दिवस त्यांना घराबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली असून, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
आणखी तीन ठिकाणी तपासणी केंद्रे
महापालिकेने आणखी तीन ठिकाणी तपासणी केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये केम्ब्रिज चौक, हर्सूल टी-पॉइंट, पैठण-बीड बायपास रोडचा समावेश आहे. आयसोलेशनची तयारी... चिकलठाणा, कबीरनगर, समाजकल्याण पदमपुरा, घाटी, सिव्हिल हॉस्पिटल, अशा एकूण पाच ठिकाणी २४२ बेडची व्यवस्था केली आहे.क्वारंटाईनसाठी जागा निश्चित : कलाग्राम, देवगिरी महाविद्यालय, एमसीईडी, समाजकल्याण कार्यालय, अशा चार ठिकाणी २,३४८ बेडची व्यवस्था केली आहे.