पैठण : औरंगाबाद येथील कोरोना पॉझिटिव्ह निघालेला रूग्ण पैठण येथे नातेवाईकाच्या घरी येऊन गेल्याची माहीती प्रशासनाला मिळाल्या नंतर तातडीने आज रात्री पैठण शहरातील शशीविहार येथील त्याच्या नातेवाईकांना औरंगाबाद शासकीय रूग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान सदर पॉझिटिव्ह रूग्ण पंधरा दिवसापूर्वी येथे आला होता अशी माहीती मिळत असून दोन दिवसापूर्वी त्याच्या लाळेचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत, असे असले तरी प्रशासनाने संबंधित नातेवाईकांना तपासणी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
पैठण शहरातील शशिविहार भागातील जावई असलेला तरूण औरंगाबाद शासकीय रूग्णालयात ब्रदर म्हणून सेवेत आहे. शासकीय रूग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात तो कर्तव्य बजावत आहे. दरम्यान दोन दिवसा पूर्वी झालेल्या चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. सदर ब्रदरची ट्रव्हल हिस्ट्री तपासल्या नंतर तो पैठण येथील सासुरवाडीस येऊन गेला असल्याची माहीती पैठण पोलिसांनी शोधून काढली. पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी या बाबत तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, पैठण शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन वार्डाचे डॉक्टर संदिप रगडे यांना या बाबत अवगत केले. या नंतर आरोग्य यंत्रणेने सदर ब्रदरचे मुळ गाव असलेल्या पाटेगावात जाऊन चौकशी केली. प्रशासनाच्या विविध विभागा मार्फत केलेल्या चौकशीत संबंधित ब्रदर हा फक्त त्याची शशी विहार येथील सासरवाडीला येऊन गेल्याचे समोर आले.
यानंतर तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, डॉ संदीप रगडे , उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे,पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आदीच्या पथकाने ब्रदरच्या सासरवाडीतील सहा जणांना कोरोना तपासणीसाठी औरंगाबाद शासकीय रूग्णालयात हलवले आहे.
शशी विहार हादरले....।शशी विहार येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याने या भागातील रहिवाशी चांगलेच हादरले आहेत. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह यावा म्हणून प्रार्थना करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.