औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने १५ ते २० मेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊन पाळण्यात आले. हे ६ दिवस कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतर शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख घसरल्याने कोरोनाचा विळखा कमी होताना दिसत आहे.
औरंगाबादेत २७ एप्रिल रोजी २९ रुग्णांचे निदान झाले आणि एकच खळबळ उडाली. एका दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ होती; परंतु या दिवसापासून रोजच वाढते रुग्ण निदान होण्यास सुरुवात झाली. निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. एका दिवशी १०० रुग्णांचे निदानही शहरात झाले. त्यामुळे कोरोनाचा विळखा घट्ट होत गेला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. लॉकडाऊन कडक करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली. ३ ते १४ मेदरम्यान विषम तारखेला शहर शंभर टक्के लॉकडाऊन, तर सम तारखेला केवळ सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर १५ ते २० मेदरम्यान १०० टक्के लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. हा आकडा शून्यावर केव्हा येतो याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
असा झाला फायदा : १०० टक्के लॉकडाऊनमुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात अन्य व्यक्ती येण्याचे टळले. तसेच बाधित व्यक्ती या घरातच राहिल्या. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची म्हणजे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. सम-विषम तारखेच्या लॉकडाऊनच्या कालावधीत आणि सध्याही नागरिकांना काही मोजके तासच मुभा देण्यात आली. तेही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयोगी ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज निदान होणाऱ्या रुगणांच्या संख्येत घट होत आहे. विशेषत: १०० टक्के लॉकडाऊननंतर रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. हीच स्थिती राहिल्यास शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल.