- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाच्या एका पॉझिटिव्ह रुग्णामागे रोज ५ हजार रुपयांप्रमाणे जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च होत आहे. रुग्णांची प्रकृती गंभीर असेल, तर यापेक्षा अधिक खर्च होतो. शहरातील रुग्णसंख्येचा विचार करता आतापर्यंत रुग्णांच्या उपचारावर ४ कोटींवर खर्च झाल्याचा अंदाज आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या निदानापासून ते उपचार होऊन कोरोनामुक्त होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाविरुद्ध शासकीय कर्मचारी असो अथवा शासकीय रुग्णालये, सर्व जण कोरोना लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिवस-रात्र एकत्रितपणे लढा देत आहेत. घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपाची कोविड सेंटर आणि काही खाजगी रुग्णालये कोरोना रुग्ण आणि संशयितांनी भरलेले आहेत. रुग्ण आढळून येण्यापूर्वी कोरोनाच्या उपचारासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली. त्यानंतर आता रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून तो बरा होऊन घरी जाईपर्यंत अनेक गोष्टींसाठी खर्च केला जात आहे. एका रुग्णावर रोज किमान ५ हजार रुपयांचा खर्च होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर पूर्वी १४ दिवस उपचार केले जात होते. आता हा कालावधी १० दिवसांवर आला आहे. त्यामुळे गंभीर नसलेल्या रुग्णासाठी जवळपास ५० हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.
एका रुग्णासाठी रोज होणारा साधारण खर्चऔषधी - एक हजार रुपये, पीपीई कीट - २ हजार १०० रुपये, एन-९५ मास्क - २०० रुपये, जेवण, नाश्ता - १०० रुपये, पाणी बॉटल - ५० रुपये. असा साधारण ३ हजार ४५० रोजचा साधारण खर्च येत असल्याचे घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले. याशिवाय विविध चाचण्या, लिलन (बेडशीट), मनुष्यबळ, वीज यांचा खर्चही वेगळा आहे.
एका रुग्णामागे दीड पीपीईएका रुग्णामागे सध्या रोज दीड पीपीई लागत आहे. हा एक पीपीई १ हजार ४०० रुपयांचा आहे. त्यामुळे पीपीईवर २ हजार १०० रुपये एका रुग्णामागे खर्च होत आहेत.
खाजगीत ७० हजार रुपयेखाजगी रुग्णालयात प्रायव्हेट रूमसाठी रोजचे ७ हजार रुपये आकारण्यात येतात. त्यामुळे उपचाराचा हा खर्च ७० हजार रुपयांपर्यंत जात आहे. यात व्हेंटिलेटरचा खर्च जोडला गेला, तर खर्च आणखी वाढतो. व्हेंटिलेटरसाठी रोजचे ३ हजार रुपये आकारण्यात येतात.
गंभीर रुग्णाचा रोजचा खर्च २० हजारगंभीर रुग्णाला आयसीयूमध्ये ठेवावे लागते. रुग्णास आॅक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरही ठेवावे लागते. त्यासाठी किमान २० हजार रुपयांचा खर्च होत असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. गंभीर रुग्णास दिवसभरात आॅक्सिजनचे किमान तीन सिलिंडर लागतात. हा खर्च रोजचा किमान हजार रुपये आहे.
अनेक गोष्टींवर खर्चऔषधी, पीपीई कीट यासह मनुष्यबळ, आॅक्सिजन, चाचण्या यानुसार होणारा खर्च कमी-अधिक होतो. एका रुग्णावर उपचार पूर्ण होईपर्यंत साधारण ५० हजार खर्च आहे; परंतु अन्य सुविधांचा विचार करता तो अधिक असू शकतो. शिवाय गंभीर रुग्णांसाठी यापेक्षाही अधिक खर्च होतो.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
नर्सिंग आणि क्लिनिकल खर्चरुग्णांवर शासनाकडून मोफत उपचार केले जात आहेत. एका रुग्णामागील खर्च काढताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण औषधीच्या किमती बदलत असतात. नर्सिंग, क्लिनिकल या दोन्हींचा विचार करावा लागेल, तरीही रोज एका डॉरमेट्रीसाठी जेवढा खर्च होतो, तेवढा खर्च पकडता येईल.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक