औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या १८ दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. या १८ दिवसांतच रुग्णसंख्या १६४९ वरून ३३४० झाल्याचे पुढे आले आहे.
औरंगाबादेत २ जून रोजी एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ६४९ होती. या तारखेपासून रोज ४९ ते १२५ च्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान होत गेले. यात १० जून रोजी कोरोनाच्या आजवरच्या विक्रमी रुग्णसंख्येने औरंगाबाद हादरले. दिवसभरात तब्बल १२५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले होते.
त्यानंतरही औरंगाबादेत शंभरावर रूग्ण आढळून येत आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढत गेला. एकूण कोरोनाबधितांची संख्या ३३४० झाली आहे. अवघ्या १८ दिवसांतच रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. एकूण रुग्णांची संख्या वाढलेली असली तरी सध्या उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
५० टक्क्यांवर रूग्ण परतले घरीशहरातील ५० टक्क्यांवर म्हणजे १७९२ रूग्ण घरी परतलेले आहेत. सध्या केवळ १३६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही बाब थोडीशी दिलासा देणारी आहे.