औरंगाबाद : घाटी रुग्णालयात शनिवारपासून कोरोनाची तपासणी सुरू झाली असून, याठिकाणी तपासलेल्या पहिल्या चारही संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. औरंगाबादेत सुरू झालेल्या या सुविधेमुळे पुणे येथील 'एनआयव्ही'च्या तुलनेत अवघ्या २४ तासाच्या आत हे अहवाल मिळण्यास मदत होत आहे.
घाटीत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हीआरडीएल) यंत्र टीबी लॅबमध्ये कार्यान्वित झाले आहे. तपासणी सुरू करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) मंजूरी मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयातून शनिवारी दुपारी २ वाजता येथील एक संशयीत आणि खाजगी रुग्णालयातील एक संशयीत, असे दोघांचे स्वॅब घाटीकडे रवाना करण्यात आले होते. तर घाटीत दाखल दोघांच्या लाळेचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
पूर्वी अशी होती स्थितीस्वाईन फ्लू निदानासाठी पुण्यातील ‘एनआयव्ही’वरच भिस्त होती. त्यानंतर सध्या धुमाकूळ घालणा-या कोरोनाच्या तपासणीसाठीही 'एनआयव्ही'वरच अवलंबून रहावे लागत होते. कुरियर अथवा स्वतंत्र वाहनाने स्वॅब पाठविण्यात येत होते. त्यामुळे निदानासाठी किमान तीन दिवस वाट पाहण्याची वेळ रुग्णांवर ओढावत होती. मात्र, घाटीत तपासणी सुरु झाल्याने अहवाल लवकरात लवकर मिळण्यास मदत होत आहे.
४० स्वॅबची एका वेळी तपासणीएका किटच्या मदतीने ४० स्वॅबची तपासणी शक्य आहे. शनिवारी तपासलेल्या चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. नियोजनाप्रमाणे तपासणी अहवाल देण्याचा प्रयत्न केला जाईल.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)