औरंगाबाद : कोरोनाबाधितांचा आकडा ३०० च्या पार गेला. त्यातील ५५ टक्क्यांहून अधिक रुग्णांत लक्षणे दिसत नाहीत. उर्वरित रुग्णांत सौम्य, मध्यम लक्षणांच्या रुग्णांची संख्या निम्म्याहून अधिक, तर तीव्र व गंभीर रुग्णांचे लवकर निदान सध्या प्रशासनासमोरचे आव्हान ठरते आहे.
स्क्रीनिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची गती आणखी वाढवण्याची गरज असून, यात जलद निदान उपयुक्त ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची पाच प्रकारात वर्गवारी केल्यास निम्मे अधिक रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. लक्षणे नसल्याने त्यांना बाधित झाल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे रोजच्या जगण्यात सहजता असते. त्यातून अधिक प्रसार होण्याची भीती नाकारता येत नाही. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
जागतिक रुग्णांना बाधित करण्याची क्षमता (आर नॉट व्हॅल्यू) ही आठ ते दहा आहे. म्हणजे आज जेवढे रुग्ण सापडले त्याच्या आठ पट लोकांना लागण झालेली असू शकते. त्यासाठी कॉन्टक्ट ट्रेसिंग, त्यांचे निदान व उपचार याला आणखी गती द्यावी लागणार आहे. अलगीकरणात ठेवलेल्यांवर लक्ष ठेवून ते सक्तीने करून घेण्यावरही लक्ष देण्याची गरज असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, तर आजार अंगावर काढू नका. इतिहासातील तपशील डॉक्टरांपासून लपवू नका. कोणतीही सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसल्यावर तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
११ मृत्यूत तीन रुग्णांचे निदान बाधित असल्याचे मृत्यूनंतर समोर आले, तर एक मृत्यू निदान झाल्यावर एका तासात झाले. त्यामुळे रुग्ण अंगावर आजार काढत असल्याचे समोर आले आहे. हा विषय आरोग्य विभागासमोर चिंतेचा बनला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजनांच्या सूचना केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाच प्रकारचे रुग्णकोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. त्यात प्रामुख्याने लक्षणे नसलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. सौम्य, मध्यम लक्षणे असलेले लोक कमी आहेत, तर तीव्र, गंभीर रुग्ण शेवटच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह लोकांना शोधणे हे क्रमप्राप्त आहे. स्क्रीनिंग कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जेवढी वाढेल तेवढे रुग्ण अधिक आढळून आल्याचे आकड्यांवरून दिसत आहे. यातून डेथरेट कमी होण्यासही मदत मिळेल.