पैठण : तालुक्यात आज एका माजी आमदारासह ३० रूग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. मुधलवाडी येथे ११ रूग्ण पॉझिटिव्ह आले असून या गावात तपासणीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पैठण शहरात आज सहा रूग्णाची वाढ झाली असून पैठण शहरापेक्षा ग्रामीण मध्ये रूग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पैठण तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या २३८ झाली असून यापैकी १४३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पैठण तालुक्यातील कोरोना सेंटर मध्ये ४३ रूग्णावर उपचार करण्यात येत असून ४५ रूग्णांवर औरंगाबाद व ईतर ठिकाणी उपचार सुरू असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
आज पैठण शहरातील भवानीनगर येथे ४ तर ईंदिरा नगर येथे दोन असे सहा रूग्ण वाढले. ग्रामीण भागात चितेगाव १, बीडकिन ३, नांदर २, नवगाव ६, मुधलवाडी ११, आखतवाडा १ असे रूग्ण आढळून आले आहेत. पैठण शहरात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक, व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचे गट पाडून कोरोना टेस्ट घेण्यात येत आहे. मात्र , पैठण शहरात रूग्ण संख्येचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने सध्या तरी पैठणकरांना दिलासा मिळाला आहे.