- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एकीकडे १२०० लोकांच्या चेहऱ्यावर रेल्वेने गावी जाण्याचे समाधान झळकत होते. दुसरीकडे निपचित होऊन पडलेले १६ देह रेल्वेतून रवाना होत होते. प्रवास दोघेही करीत होते. फरक फक्त एवढाच की १२०० लोकांचा आनंदी प्रवास सुरू झाला आणि १६ जणांचा जगाला सोडून जाण्याचा अखेरचा प्रवास होता.
जिवंतपणी वाहतूक सुविधेअभावी पायीच गावी जाताना रेल्वेखाली सापडून मृत्यूने झडप घातली आणि मृत्यूनंतर रेल्वेने मृतदेह गावी पाठविण्याची वेळ आली. बदनापूर- करमाडदरम्यान मालगाडीखाली सापडून मृत्यू पावलेल्या मजुरांसोबत नियतीने हा अजब खेळ खेळला. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन आहे. या परिस्थितीत शहरात अडकलेल्या नागरिकांना, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याची तयारी महसूल प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने केली. औरंगाबादहून १२०० लोकांना घेऊन शुक्रवारी जबलपूरला रेल्वे रवाना झाली. याच रेल्वेने मालगाडीच्या अपघातात मृत्यू पावलेल्या १६ जणांचे शव पाठविण्यात आले.
घाटी रुग्णालयातून रवाना झालेल्या तीन रुग्णवाहिका सायंकाळी ७.३० वाजता रेल्वेस्टेशनवर दाखल झाल्या. यातून आधी ८ मृतदेह आणण्यात आले. रेल्वेस्टेशनच्या पार्किंगच्या परिसरातील प्रवेशद्वारापर्यंत या तिन्ही रुग्णवाहिका पोहोचल्या. त्यानंतर जवळपास अधार्तास मृतदेह रुग्णवाहिकेतच होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिकेतून पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह रेल्वेच्या सामानच्या बोगीत ठेवण्यात आला. त्यानंतर एक-एक मृहदेह याठिकाणी ठेवण्यात आले. घाटीतील अन्य मृतदेह नेण्यासाठी याच रुग्णवाहिका रवाना झाल्या. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास आणखी ८ मृतदेह घेऊन या तिन्ही रुग्णवाहिका दाखल झाल्या. रात्री १० वाजेच्या सुमारास शेवटचा मृतदेह बोगीत ठेवण्यात आला. रेल्वेच्या सामानाच्या बोगीत हे मृतदेह ठेवतानाचे हे दृश्य पाहून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. रेल्वेस्टेशन व्यवस्थापक अशोक निकम, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अरविंद शर्मा, लोहमार्ग पोलीस निरीक्षक दिलीप साबळे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त होता.
जखमी आणि बचावलेले चौघे रवानाशुक्रवारी पहाटेच्या अपघातात जखमी झालेला एक जण आणि अपघातातून बचावलेले चौघेही रात्रीच्या रेल्वेने मध्यप्रदेशकडे रवाना झाले. रेल्वेत बसण्यापूर्वी या चौघांना पोलिसांनी जेवणाची पाकिटे दिली. चौघांच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते. त्यांचे चेहरे थकल्यासारखे दिसत होते. नि:शब्द भावनेने ते रेल्वेत बसले. रात्रभर सोबत करणाऱ्या १६ सहकाऱ्यांचे मृतदेहही याच रेल्वेतून सोबत करीत असल्याच्या दु:खाची सल मात्र होती.
सामानाच्या बोगीत मृतदेहमृतदेह ठेवण्याची व्यवस्था ही रेल्वेच्या सामानाच्या बोगीत करण्यात आली होती. याठिकाणी एक - एक मृतदेह ठेवण्यात आला. मृत्यूनंतर ह्यपार्सलह्ण बोगीत ठेवताना अनेकांचे मन हळहळले. जबलपूर येथून सर्व मृतदेह त्यांच्या गावी नेण्याचे नियोजन करण्यात आले.
हे धावले मदतीलामृतदेह घाटीतून रेल्वेस्टेशनला आणण्यासाठी आणि मृतदेह रेल्वेत ठेवण्यासाठी चाचू अॅम्ब्युलन्स ग्रुपचे किरण रावल, शेख इम्रान, प्रदीप शिंदे आणि केके ग्रुपचे उपाध्यक्ष किशोर वाघमारे, इजहार शेख, लखन भिंगारे आदींनी मदत केली.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थितीमृतदेह रवाना करताना ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची उपस्थिती होती. या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह गावी पाठविण्यात आले आहेत. नातेवाईकांना किमान अंत्यविधी करता येईल, असे त्या म्हणाल्या.
रेल्वेतील अन्य प्रवासी झाले भावुक या रेल्वेने १२०० प्रवासी रवाना झाले. अनेकांना या रेल्वेत दुदैर्वी अपघातात मयत झालेल्या मजुरांचे मृतदेह नेण्यात येत असल्याची कल्पना नव्हती. मात्र, पोलीस, रुग्णवाहिक आणि त्यातून उतरणारे मृतदेह पाहून ही बाब लक्षात आली. तेव्हा अनेक प्रवासी भावुक झाले.
दुदैर्वी घटनेची साक्षीदार होणे दुर्दैवचआम्ही दीड महिन्यापासून गावी जाण्याची प्रतीक्षा करीत होतो. तो क्षण आला; परंतु आम्ही ज्या रेल्वेने जात आहोत, त्याच रेल्वेने आमच्या येथील काहींचे मृतदेह रवाना होतील, असे कधीही वाटले नव्हते. ही खूपच दुदैर्वी घटना घडली.- रोहिणी परिहार, प्रवासी
मृत्यूनंतर प्रवास क्लेशदायक पाच महिन्यांपूर्वी गावी गेलो होतो. त्यानंतर पुन्हा आलो होतो. चालक म्हणून काम करीत होतो; पण गेली काही दिवस खूप अडचणी आल्या. त्यामुळे गावी जात आहे. आमच्यासोबत मृत्यू पावलेल्या लोकांचाही प्रवास घडत आहे. त्यांची आधीच सुविधा झाली पाहिजे होती.- प्रकाश यादव, प्रवासी