औरंगाबाद : सातारा येथील भारत बटालियन ( राज्य राखीव बल )च्या ६७ जवानांनी मंगळवारी कोरोना वर मात केली. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव(जिल्हा नाशिक) येथे दिड महिन्याचा बंदोबस्त करून भारत राखीव बटालियनची एक कंपनी ८ मे रोजी औरंगाबाद्ला परतली होती. यातील तीन अधिकाऱ्यासह ७४ जवानांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते .
भारत राखीव बटालियनच्या मालेगाव(जिल्हा नाशिक) येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या एका कंपनीतील काही जवानांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यामुळे येथे आलेल्या सर्व जवानांना थेट सातारा येथील राज्य राखीव दलाच्या कॅंपस मध्ये प्रवेश न देता श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ठेवले होते . दुसऱ्या दिवशी सर्व जवानांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत तीन अधिकाऱ्यासह ७४ जवानांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते . तेंव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते . या उपचाराला ६७ जवानांनी प्रतिसाद देत कोरोनावर मात केल्याचे मंगळवारी सामोर आले.
सोमवारी सर्व जवानांची कोरोना तपासणी करण्यात आली होती यातील ६७ जवानांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. तर ७ जवानांचे अहवाल पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी तीन जवानांवर धूत हॉस्पिटलमध्ये तर चार जवानांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती सहायक समादेशक आय . एस .शेख यांनी दिली. डॉ नीता पाडळकर, डॉ . सुहास वाव्हळे, औषधी निर्माता अधिकारी राजेंद्र बोऱ्हाडे, सुनील सूर्यवंशी, मुकेश कासाट यांनी जवानांवर यशस्वी उपचार केले.