सोयगाव : तालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचायतीने उपाय योजनांसाठी तातडीचा निर्णय घेत गावात विना मास्क, विनाकारण भटकंती करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रु दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत सदस्य,सरपंच आणि उपसरपंच व ग्रामसेवक यांचेशी हुज्जत घालणाऱ्या समाजकंटका ला १००० रु चा दंड ठोठावण्याचा येवून हा दंड नियम मोडणाऱ्या व्यक्तीने न भरल्यास त्याच्या नळपट्टीत आणि घर पट्टीवर सर्वांसमक्ष बोजा टाकण्याची तरतुदीचा ठराव शुक्रवारी गोंदेगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडाची तरतूद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेणारी राज्यातील गोंदेगाव ता.सोयगाव हि पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.या ठरावाच्या प्रती तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाला सादर करण्यात आल्या असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील राकडे यांनी सांगितले. सोयगाव तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदेगाव ग्रामपंचायतीचं सरपंच पुष्पाबाई नेरपगार,उपसरपंच सुनील बोरसे,ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी सर्वानुमते ठराव मंजूर करून ठरावाच्या प्रती गावाच्या दर्शनी भागात चिटकविल्या आहे.त्यामुळे आता सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव गावात संचारबंदी आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला खिशात पाचशे रु ठेवावे लागणार असल्याने शुक्रवारी गोंदेगावात शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायतीने उल्लंघन करणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली असून हि समिती घरातच बसून सोशल मिडीयाच्या माध्यमातून यावर लक्ष ठेवणार असून उल्लंघन करणाऱ्याच्या मोबाईलवर संदेश प्राप्त होईल त्यामुळे गोंदेगावात आता लॉक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्यावर कटाक्षाने लक्ष असणार आहे.
पोलिसांच्या दिमतीला ग्रामपंचायत-लॉकडाऊन आणि संचारबंदीचे पालन करण्यासाठी सोयगाव पोलिसांकडून मोठी जनजागृती हाती घेण्यात आली असून आता यापुढे पोलिसांच्या दिमतीला ग्राम पंचायत असणार आहे.
निर्णयाचा सोशल मिडीयावर प्रसारया निर्णयाचा शुक्रवारी दिवसभर सोशल मिडीयावर प्रसार करण्यात आल्याने या मोहिमेला पुन्हा बळ मिळाले असून ग्रामस्थही या निर्णयाला हिरवा सिग्नल मिळाला आहे.
या उपक्रमाचे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी अनुकरण केल्यास सोयगावला कोरोनाची एन्ट्री होणे शक्य नाही. लोकसहभागाची आता आवश्यकता आहे.- प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव
लॉक डाऊन शंभर टक्के पालन करण्यासाठी व कोरोनाशी दोन हात करण्यासाठी हा निर्णय बळकट ठरेल.- सुदर्शन तुपे, गटविकास अधिकारी सोयगाव.
कठोर कायद्याने गोंदेगाव कोरोनामुक्त होण्यास मदत होईल.- सुनील राकडे, ग्रामविकास अधिकारी गोंदेगाव