- संतोष हिरेमठऔरंगाबाद : करोना पॉझिटिव्ह मातेकडून जन्मणाऱ्या शिशूला करोनाची बाधा होण्याचा धोका नसतो. गरोदरपणात संक्रमणचे प्रमाण शून्य टक्के आहे. शिवाय स्तनपानातूनही करोनाचा संसर्ग होत नाही. परंतु प्रसुतीनंतर शिशूला मतेपासून दूर ठेवणे आणि योग्य ती खबरदारी घेऊन स्तनपानासाठीच मातेजवळ नेणे गरजेचे असते, असे डॉक्टरांनी सांगितले.
शहरात एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ही महिला जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. गरोदर मातेला जर कोविड –१९ या विषाणूचा संसर्ग झाला असेल, तो गर्भातील बाळाला सुद्धा होत असल्याचा आतापर्यंत समोर आलेले नाही. जन्मजात संक्रमणचे प्रमाण शून्य टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चीनमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, जर आईला कोविड–१९ चा संसर्ग झाला असेल तर तो बाळाला होत नाही. परंतु हा अभ्यास संसर्ग झालेल्या फक्त काही गर्भवती महिलांविषयीच आहे. या महिलांना झालेली बाळे वेगळी ठेवली गेली होती आणि त्यांच्या मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची कुठलीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे जन्मजात कोरोना होत नाही. परंतु जन्मानंतर बाळाची पुरेशी खबरदारी घेतली नाही तर संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले.
दूध पाजल्यानंतर दूर ठेवावे
गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असेल तरी बाळाला होणारे संक्रमण सध्या शून्य टक्के आहे. आईच्या दुधातूनही संक्रमण होत नाही. मात्र, जन्मानंतर संपर्कातून कोरोना होऊ शकतो. प्रसूतीनंतर बाळाला आईचे दूध पाजता येते. त्यापूर्वी काही खबरदारी घ्यावी लागते. दूध पाजल्यानंतर बाळाला आईपासून दूर ठेवले पाहिजे. जन्मजात कोरोना नसतो. - डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, घाटी
दूध पाजणे महत्वाचे
गर्भात असताना असताना शिशूला बाधा होईल का, सांगता येत नाही. मात्र, प्रसूतीनंतर तपासणीतून त्याचे निदान करणे शक्य आहे. अशा परिस्थितीतही बाळाच्या प्रतिकारशक्तीसाठी आईचे दूध पाजणे अधिक महत्वाचे असते. त्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे. - डॉ. रेणू बोराळकर, अध्यक्ष, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना
प्रसूतीनंतर तपासणी
कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या प्रसूतीनंतर शिशूची तपासणी केली जाईल. त्यातून सर्वकाही स्पष्ट होईल. आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. - डॉ. कमलाकर मुदखेडकर, स्त्रीरोगशास्त्र विभाग प्रमुख, जिल्हा रुग्णालय
जिल्हा शल्यचिकित्सकही म्हणाले धोका नाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी ही शिशूला कोरोना होण्याचा धोका नसल्याचे स्पष्ट केले.