औरंगाबाद : विविध ठिकाणच्या प्रवाशांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. यामुळे पुणे, नागपूर , मुंबई अशा कोरोनाची लागण असलेल्या भागातून शहरात आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेने सिडको बस स्थानकात आरोग्य पथक तैनात केले आहे. हे पथक बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांची स्क्रिनिंग करूनच त्यांना पुढे पाठवत आहे.
राज्य शासनाने गर्दी टाळा असे आवाहन केल्यानंतर मेट्रो सिटीमध्ये अनेकांना सुटी देण्यात आली आहे.तसेच अनेक विद्यार्थी सुद्धा यामुळे शहरात परतत आहेत. यामुळे कोरोनग्रस्त भागातून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची लागण असल्याची शंका लक्षात घेऊन महापालिकेने सिडको बस स्थानकावर एक आरोग्य पथक तैनात केले आहे. हे पथक बसस्थानकात पुणे, नागपूर आणि मुंबई येथून आलेल्या प्रवाशांची प्राधान्याने स्क्रिनिंग करत आहे. तसेच शहरातसुद्धा कोरोनाची लागण झालेली एक महिला उपचार घेत आहे. यामुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची सुद्धा येथे स्क्रिनिंग करण्यात येत आहे.'
लक्षणे जाणवल्यास पुढे रेफर स्क्रिनिंग दरम्यान जर एखाद्या प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास प्राथमिक उपचार करून त्याला लागलीच विलगीकरण केंद्रात अधिक उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. तसेच संशयितांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक, पावसाचा इतिहास याची नोंद ठेवण्यात येत आहे.
प्रवासी घेत आहेत काळजी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सर्वजण काळजी घेत आहेत. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून प्रवासी बस स्थानकावर दिसत आहेत. तसेच स्क्रिनिंगसाठी आरोग्य पथकाकडे प्रवाशी स्वतःहून येत असल्याचे चित्र आहे.