औरंगाबाद : महापालिकेने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत ४४ नागरिक शहरात दाखल झालेले आहेत. त्यातील एका महिलेने गुरुवारी कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
राज्य सरकारने नवीन विषाणूची खबरदारी घेण्यासाठी महिनाभरात ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी प्रशासक सुनील चव्हाण यांच्या आदेशावरुन महापालिकेने २५ नोव्हेंबर नंतर ब्रिटन येथून शहरात आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले. विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त यादी ४४ पर्यंत गेली आहे. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान शहरात ४४ नागरिक ब्रिटन येथून आले आहेत. त्यापैकी ७ जणांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी केली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, ब्रिटन येथून १५ नोव्हेंबर रोजी एक महिला शहरात दाखल झाली. या महिलेने गुरुवारी सकाळी बन्सीलालनगर येथील आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली. शुक्रवारी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
लाळेचे नमुने पाठविले तपासणीसाठी पुण्यालामहिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. या महिलेला नवीन विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी महिलेच्या लाळेचे नमुने पूणे येथील राष्ट्रीय विषाणूजन्य प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.