लासूर स्टेशन: तळीरामांची नशा भागवून नफा कमविण्याच्या उद्देशाने अवैध दारू विक्रेते काय डोकं लावतील याची कल्पना न केलेलीच बरी. लासुर स्टेशन येथे गुरूवार दि.9 रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान अशीच एक नामी शक्कल लढवून चक्क दोन पाण्याच्या जार मधून चाळीस लीटर अवैध हातभट्टीची दारू विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना शिल्लेगाव पोलिसांनी पकडले. समीर छोटू शेख (वय 38), अलीम सलीम सय्यद (वय28) दोघे रा. शक्कर भाई मोहला. लासुर स्टेशन असे आरोपींचे नावे आहेत. या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पो.काॅ. शुभम पालवे, अनिल दाभाडे, दादाराव तिड़के हे गुरूवार दि.9 रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान लासुरगांव रस्त्यावर राममंदिरा जवळ गस्त करित होते. त्यावेळी त्यांना एका दुचाकीवरून ( एम एच 20 डी जी 3518) दोघेजण दोन पाण्याचे जार घेऊन जाताना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वारांना थांबवले.
यावेळी दोन्ही जार तपासले असता त्यात हातभट्टीची दारू असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून चार हजार रुपये किंमतीची हातभट्टीची दारू असलेले दोन जार व एक मोटरसायकल जप्त करून दोन्ही आरोपी विरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रँडेड दारूपेक्षा जास्त भावात विक्रीनोंदणीकृत देशी-विदेशी दारूचे दुकान व बार सील करण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मोठी गैरसोय झाली आहे हीच संधी साधून अनेकांनी हातभट्टीची दारू उपलब्ध करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. आरोग्याला अत्यंत घातक करू शकेल अशी ही दारू ब्रँडेड दारू पेक्षाही जास्त महाग विक्री होत असल्याची चर्चा आहे हे विशेष