- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरातील कोरोनाची लागण झालेल्या प्राध्यापिकेची दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील २१ विद्यार्थ्यांचे व अन्य १ जणांचे अहवाल देखील निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी दिली आहे. यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला आहे.
शुक्रवारी याच प्राध्यापक महिलेच्या घरातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तसेच त्यांच्या जवळच्या संपर्कातील प्राध्यापिकेचा अहवाल सुद्धा यापूर्वीच निगेटिव्ह आला होता, यामुळे शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या दूर असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. रशिया येथून दिल्ली मार्गे शहरात आलेल्या प्राध्यापक महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य पथकाने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली होती. यातील त्यांच्या घरातील आणि संस्थेतील सर्व अवहाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच शहरातील अन्य १ जणाचा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेली महिला आणि संशयित अशा सर्वांचे अहवाल निगेटिव्ह येणे शहरवासीयांसाठी मोठा दिलासा देणारे आहे.