औरंगाबाद : ‘देव हाच सर्वात मोठा चिकित्सक आहे. मला माहीत नव्हते की, मला धोकादायक विषाणूची बाधा होऊ शकते. शेवटी जीवन-मरणाच्या लढाईत मी यशस्वी झाले. ही कोरोनाविरोधातील लढाई माझी एकटीची नाही. हे युद्ध आहे. ते सर्वांना मिळून जिंकायचे आहे’, असे मत कोरोनामुक्त झालेल्या प्राध्यापिकेने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत सहयोगी प्राध्यापिका कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचाराअंती घेतलेल्या दोन चाचण्यांमध्ये निगेटिव्ह आल्या आहेत. या काळात घडलेल्या तणावपूर्ण सर्व घटना त्यांनी ‘लोकमत’शी मुक्तपणे शेअर केल्या. त्या म्हणाल्या, रशियाची सहल ही मला ओळखणाऱ्या सर्वांसाठी चर्चेची विषय ठरली आहे. मोठ्या हौसेने मी सुनेबरोबर हा प्रवास प्लॅन केला होता. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे टूर रद्द करण्याचा विचारही झाला. मात्र, टूर आॅपरेटरने टूर रद्द करण्याएवढी स्थीती नाही, असे म्हटले. रशियातील उणे २२ डिग्री तापमानातील अनुभव आनंददायी होता. त्याठिकाणी काहीही झाले नाही. विमानतळांवर कुणी चीन किंवा कोरियाचा प्रवासी तर नाही ना अशी धास्ती वाटत असे. आलमाटी येथे विमान बदलण्यासाठी चार तास वाट पाहावी लागली. स्क्रीनिंग होत होते तरी भीती होतीच. हृदयाची धडधड वाढली. सर्वाधिक अनिश्चितता दिल्ली विमानतळावर होती. औरंगाबादेत ३ मार्च रोजी पोहोचले.
शिस्तीत जगण्याचा माझा स्वभाव आणि कर्तव्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ मार्च रोजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे ‘व्हायवा’ सुरू केले. ७ मार्च रोजी तब्येत थोडी खराब झाल्याचे वाटले. तेव्हा डॉक्टर मुलाला विचारले असता, त्याने अॅन्टिबायोटिक घेण्याच्या सूचना केल्या. ११ मार्च रोजी थंडी वाटत होती, श्वास घेण्यास त्रास होत होता. ब्लड टेस्ट केली. १३ मार्च रोजी खाजगी दवाखान्यात दाखल झाले. अनेक अडचणींनंतर आयसीयू आयसोलेशन वॉर्डात अॅडमिट करण्यात आले. तेव्हा वाटले नाही की, कोरोना पॉझिटिव्ह असेल. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आला. तेव्हा अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. माझे कॉलेज अडचणीत येईल, सामाजिक स्वास्थ्य बिघडेल. यानंतरच्या काही चर्चा ऐकल्यावर माझ्या मनाला वाटले की, माझ्यासारख्या कर्तव्यदक्ष शिक्षकाला दोषी ठरविले जात आहे. मी व्हायरस नाही, दुर्दैवाने व्हायरसने मला गाठले.
एवढ्या दिवसात माझ्यासोबत फक्त मोबाईल होता. माझ्यासोबतच्या सहकारिणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे वाचले. तेव्हा मला धक्काच बसला. मी आठवायचा प्रयत्न केला की, तिच्याशी माझा केव्हा संपर्क आला. ७ मार्च रोजी महिला दिन साजरा केल्यानंतर आम्ही सोबत जेवण केले होते. तेव्हा मला प्रश्न पडला की, घरातील इतरांचे काय? माझी आई, स्वयंपाक करणारी महिला, सहकारी प्राध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थी? यांचे काय होणार, हाच प्रश्न सतावत होता. माझ्या विद्यार्थ्यांनी व्हॉटस्अॅपला जे काही लिहिले ते धक्कादायक होते. त्यात वेगवेगळे अँगल्स होते. काही विद्यार्थी माझ्या संपर्कात होते. धीर देत होते. आमचे प्राचार्य, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, पालक आणि माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी माझ्या मुलाला आणि पतीला अनेक प्रश्न विचारण्यात येत होते. माझ्यासारख्याच परिस्थितीतून तेसुद्धा जात होते. हाच प्रश्न रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनाही विचारण्यात येत होता. गाडी रुळावरून घसरली होती. पुन्हा ती रुळावर येईल का? हाच प्रश्न होता. तेव्हा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. माजी विद्यार्थी आणि कुटुंबियांचे स्नेही यांच्या शुभेच्छा पाठीशी होत्या.
हॉस्पिटलमधील काही कर्मचारी घाबरलेले असताना अलेक जेकब, अतुल वडगावकर, सिस्टर श्रद्धा, इन्चार्ज सिस्टर निम्मी यांनी सुरक्षिततेसाठी साखळी निर्माण केली. काही कमतरता पडत नाही ना? याकडे लक्ष दिले. याचवेळी डॉ. हिमांशू गुप्ता आणि डॉ. अरुण गवळी यांनी उपचार केले. या काळात माझे मनोधैर्य उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मला आयसीयूमध्ये एकटेपणा जाणवू नये, यासाठी प्रयत्न केले. ही लढाई एकटी हाताळू शकत नव्हते. स्ट्राँग औषधी देण्यात येत होत्या. त्याचा त्रास होत होता. तरीही लढाई सुरू होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी माझा मुलगा आणि कर्मचाऱ्यांसोबत एकत्र येत माझे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले. तेव्हा दिलासा मिळाला. त्यापेक्षाही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले सहकारी, घरातील व्यक्ती, विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा आनंद अधिक होता. महान चिकित्सक असलेला देव मलाच नव्हे, तर माझ्यासह इतरांनाही संरक्षण देत होता, हे महत्त्वाचे होते, असेही त्यांनी सांगितले.