औरंगाबाद : दोन महिन्यांपासून आजवर ज्यांनी परदेशवारी केली आहे, त्यांनी स्वत:हून माहिती देऊन तपासणी करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर नागरी सुरक्षेला बाधा पोहोचविल्याच्या कारणावरून गुन्हे दाखल करण्यात येतील. परदेशवारी केल्याची माहिती शेजाऱ्यांनी जरी दिली तरी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची उपस्थिती होती.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिडको बसस्थानक, नगरनाका येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी केली जात आहे. आगामी दोन दिवसांत जिल्ह्याला इतर जिल्ह्यांतून जोडणाऱ्या सर्व सीमांवर स्क्रीनिंग केली जाईल. तसेच शहर व जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे चौधरी म्हणाले.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सर्व शासकीय, प्रादेशिक कार्यालयांसाठी परिपत्रक जारी केले आहे. नागरिकांनी शासकीय कार्यालयात येऊ नये. ई-मेल, व्हॉटस्अॅपद्वारे तक्रारी व इतर कागदपत्रे नागरिकांना दाखल करता येतील. इपिडेमिक कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नागरिकांनी ये-जा करण्यासाठी शक्यतो एकच रस्ता वापरावा. प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कक्ष स्थापन करावा. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के कार्यालये बंद नसतील. रोटेशनप्रमाणे कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल प्रशासनाला सदरील निर्णय लागू नाही. ज्यांनी रजेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना १०० टक्के रजा देण्यात येईल. नागरिकांनी गर्दी करू नये, विनाकारण प्रवास टाळावा, गर्दीत जाणेही टाळावे, कुटुंबाचा विचार करावा, असे आवाहन चौधरी यांनी केले.
...तर पोलीस बळाचा वापर करणार जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी आदेशाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला तर गुन्हे दाखल करावे लागतील. वेळप्रसंगी पोलीस बळाचादेखील वापर करावा लागेल. येत्या दोन दिवसांत प्रशासनाच्या आवाहनास दाद दिली नाहीतर जमावबंदी आदेश १०० टक्के अमलात आणला जाईल. आजवर गुन्हे दाखल केले नाहीत, परंतु यापुढे गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू. ४या सर्व प्रक्रियेतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. येणारे १० दिवस काळजीचे आहेत. बाजारपेठा रोटेशनप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय लवकरच होईल. १०० टक्के बाजारपेठा बंद ठेवणे हा पर्याय नाही. शहर अजून दुसऱ्या टप्प्यात गेले नाही. परंतु नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन चौधरी यांनी केले.
हॉटेल्स, पानटपऱ्यांबाबतही होणार निर्णयहॉटेल्समध्ये गर्दीचे प्रमाण वाढते आहे. वर्क फ्रॉम होममुळे रात्रीच्या वेळी गर्दी दिसते आहे. तसेच पानटपऱ्यांवरही गर्दी दिसते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेथे गर्दी होते, ती ठिकाणे बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. हॉटेल्सबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच पानटपऱ्यांबाबतही निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले.