औरंगाबाद : मागील पाच महिन्यांत कोरोना आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी मोठ्या प्रमाणात संसर्गाला बळी पडत आहेत. गेल्या पाच महिन्यांत शासकीय, महापालिका व खासगी रुग्णालयातील तब्बल ३०१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील दोन डॉक्टरांचा बळीही गेला आहे. १९५ कोरोना योद्धे बरे होऊन कामावर परतले, तर १०६ जणांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाच महिन्यांपासून शासकीय यंत्रणा दिवस-रात्र झटत आहे. मात्र, कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. सध्या शहरात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू असल्याचे सेरो सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी चोवीस तास सज्ज असलेले डॉक्टर, त्यांना सहकार्य करणाऱ्या नर्स व इतर कर्मचारी यांनादेखील कोरोनाचा धोका वाढत आहे. पाच महिन्यांत दोन डॉक्टरांचा बळी गेल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. रोशनगेट व सिडको एन-३ भागातील हे अनुक्रमे ७३ व ७१ वर्षे वयाचे हे डॉक्टर होते. या डॉक्टरांसह पाच महिन्यांत तब्बल ३०१ आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात महापालिकेचे २८, घाटी व मिनी घाटीतील ९५, तर खासगी रुग्णालयातील १७८ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १९५ जणांची रुग्णालयातून सुटी झाली असून, १०६ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
पाच महिन्यांची स्थिती : १९५ जणांना सुटी, १०६ वर उपचार सुरूडॉक्टरांची संख्या २०० : तब्बल २०० पेक्षा जास्त डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच परिचारिका, आशा स्वयंसेविका, एमपीडब्लू, एनएनएम, आरोग्यसेवक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, पर्यवेक्षक यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. प्रत्येक रुग्णालयात पीपीई कीट, मास्कचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जात असले तरी डॉक्टरच कोरोनाबाधित होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.