औरंगाबाद : शहरातील कोरोना (कोविड) हॉस्पिटलमध्ये किती खाटा शिल्लक आहेत, किती रुग्णांना व्हेंटिलेटर सुरू आहे, याची माहिती हॉस्पिटल व्यवस्थापनाला बाहेर फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची माहिती जिल्हा प्रशासनालाही कळवावी लागेल, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.
कोविड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध खाटांबाबत माहितीचा फलक लावण्याचा निर्णय दिल्लीमध्ये घेतला आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. खाटांची माहिती रुग्णालयाबाहेर डिजिटल बोर्डावर द्यावी लागेल. डिजिटल बोर्ड शक्य न झाल्यास खाटांच्या माहितीचा फलक लावावा लागेल, त्याची माहिती प्रशासनाला द्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ कोविड हॉस्पिटलसाठी हा नियम बंधनकारक आहे.
विभागीय आयुक्तांनी दिला इशारा मराठवाड्यातील सर्व कोविड हॉस्पिटल्समध्ये किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला बाहेर लावावी लागणार आहे. हा नियम सर्वत्र लागू राहणार आहे. रुग्णांबाबत बेजबाबदारपणे वागल्याची तक्रार आली, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला.