औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रातील १७३ मराठी बांधव दुबईत अडकले आहेत. त्यांना एअरलिफ्ट करण्याची तयारी सुरू असून, त्यांना घेऊन येणारे विमान मुंबईऐवजी औरंगाबादविमानतळावर लॅण्ड करण्याची परवानगी मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याशी सोमवारी एका शिष्टमंडळाने चर्चा केली.
दुबईत अडकलेल्यांमध्ये औरंगाबादसह मुंबई, पुणे, अहमदनगर, जळगाव आणि विदर्भातील मराठी बांधवांचा समावेश आहे. त्यांना औरंगाबाद विमानतळावर एका विमानाने आणण्यात येणार आहे. त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी विमान येथे उतरण्याबाबत चर्चा केली, त्यांनी हरकत नसल्याचे सांगितले; परंतु राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून परवानगी घेण्यासाठी त्यांनी सूचित केले, अशी माहितीे या प्रक्रियेत सहभागी असलेले कृष्णा कदम यांनी सांगितले.
दुबईतील मराठी उद्योजक धनंजय दातार हे या प्रकरणात पुढाकार घेत आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांनी त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी एका विमानाने सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्रात पाठविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाशी संपर्क केला आहे. मुंबई विमानतळावर परवानगी मिळत नसल्यामुळे औरंगाबाद विमानतळ मध्यवर्ती ठिकाण म्हणून पुढे आले आहे. येथून त्या १७३ मराठी बांधवांना टॅक्सीने त्यांच्या घरापर्यंत तपासणी करून पाठविण्यात येईल, तसेच त्यांना होम क्वारंटाईनदेखील करण्याबाबत निर्णय होईल, असेही कदम यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले की, परवानगीसाठी एक शिष्टमंडळ भेटून गेले आहे. कुणा-कुणाची परवानगी लागेल, याबाबत त्यांना सांगितले आहे. विमानतळाबाबत काहीही अडचण नाही. सगळ्या परवानग्या मिळाल्या की, पुढे जाता येईल.