औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात १० ते १८ जुलैपर्यंत प्रशासनाने जनसंचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायीक आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहराचे सर्वंकष निरीक्षण करून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात सोमवारी बैठक झाली. बैठकीनंतर संचारबंदीचा निर्णय जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जाहीर केला.
कोरोनाचा विळखा शहर आणि ग्रामीण भागाभोवती घट्ट होत चालला आहे. शिस्त आणि नियमांच्या पालनातूनच कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्यामुळे शहरवासीयांना प्रशासनाने १० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला देऊन सर्वकष निरीक्षण सुरु केले होते. आज विभागीय आयुक्तालयात झालेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकीनंतर शुक्रवारी १० जुलै ते १८ जुलै पर्यंत संचारबंदीवर शिक्का मोर्तब करण्यात आला. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, संचारबंदीचा निर्णय झाला आहे, या काळात सर्व काही बंद असणार आहे. उद्योग, व्यापार, भाजीपालाबंद असेल. थोड्याच वेळात मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त संयुक्त आदेश काढणार आहेत, त्यात संचारबंदीचा आराखडा असेल.
उद्योगही बंद असणारवाळूजसह सात गावांमध्ये यापूर्वीच ४ ते १२ जुलैदरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामध्ये उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. नव्या आदेशानुसार उद्योगही 18 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
शहरात 10 नवीन कंटेन्मेंट झोन
वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेने १० नवीन कंटेन्मेंट झोन तयार केले आहेत. याठिकाणी नागरिकांना बाहेर पडण्याची अजिबात मुभा नाही. प्रत्येक कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांसोबत महापालिकेचे कर्मचारीही गस्ती पथकात नेमण्यात आले आहेत. प्रत्येक कंटेन्मेंट झोनमध्ये शंभर टक्के लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे निर्देश वॉर्ड अधिकाऱ्यांना प्रशासनाने दिले आहेत. शहरामध्ये आतापर्यंत २८ कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. पूर्वीच्या १८ कंटेन्मेंट झोनचा अभ्यास करून ते हळूहळू वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. नव्याने तयार झालेल्या १० कंटेन्मेंट झोनवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ज्या भागामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत त्या वसाहती पत्रे लावून सील करण्यात आल्या आहेत. प्रत्येक कंटेन्मेंट झोनसाठी दोन शिफ्टमध्ये पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला संबंधित वॉर्ड कार्यालयामार्फत दोन शिफ्टमध्ये मनपाचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
नव्याने तयार झालेले कंटेन्मेंट झोन : कैलासनगर, विश्रांतीनगर, जयभवानीनगर, संभाजी कॉलनी, मयूरनगर-हडको, रामनगर, शिवाजीनगर, सिल्क मिल कॉलनी, शिवशंकर कॉलनी, परदेशी टॉवर शाहनूरवाडी.