औरंगाबाद : जुन्या शहरात जनता कर्फ्युत सहभागी होण्यासाठी रोजपेक्षा तास दोन तास अगोदर काम आटोपण्याची लगबग होती. रविवारी पहाटे वृत्तपत्र, दूध, ब्रेड-पाव विक्रेते, डेली निड्स दुकानदारांचा यात समावेश होता. तर कचरा वेचकांसह स्वच्छता व आरोग्य कर्मचारी मात्र रोजच्या कामावर दिसून आले.
दूध वितरणासाठी रोज सकाळी सहाला गिरणार तांड्याहून शहरात येणारे रणजित राठोड आज सकाळी दोन तास अगोदर घरातून बाहेर पडले. शहराततील दूध वितरण लवकर संपवून सातच्या आत घरी जाण्यासाठी निघाले होते.
तसेच दूध बॅग रोज पाच पर्यंत मिळतात त्या आज दोन तास अगोदर मिळाल्याने कामही दोन तास अगोदर संपल्याचे दूध बॅग विक्रेते बाळासाहेब पूदाट यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेत्यांनीही अजब नगर, आकाशवाणी चौक खडकेश्वर भागात सकाळी चार पासूनच कामाला सुरुवात केली होती. सात पर्यंत वितरण संपवून तेही जनता कर्फ्युचे पालन कारणासाठी घरी परतले.
बुढिलेन शहागंज बेगमपुरा नागेश्वर वाडी, चेलीपुरा भागात तुरळक डेली निड्सची दुकाने ब्रेड खारीचा दुकाने सात पर्यंत सुरू होती. जनता कर्फ्युत सहभागी होत बहुतांश सातला दुकाने बंद झाली. कचरा वेचक शहागंज, टाऊन हॉल भागात सकाळी पाच वाजेपासून दिसून आली. तर महापालिका कर्मचारी, घंटागाड्याही काम करतांना दिसून आले.