औरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांच्या निवासस्थानाच्या ३ कि . मी. परिघातील घरांच्या सर्वेक्षणाचे काम रविवारपासून हाती घेतले आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांकडेच सुरक्षेच्या पुरेशा उपाय योजना नसल्याचे पुढे आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णाचे निकटवर्ती, रहिवासी आणि नातेवाईकांशी संपर्क साधून प्राथमिक चौकशी आणि तपासणी सुरू केली. त्यात कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्याबरोबरच रुग्ण ज्या भागात राहतो, त्या भागात ९ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले. रविवार आणि सोमवार असे सर्वेक्षण झाले असून या पथकातीत कर्मचाऱ्यांकडेच कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचा अभाव असल्याचे पुढे आले आहे. यामुळे पथकातील कर्मचारी आणि नागरिक यांच्या आरोग्याला धोका संभवत आहे.
रविवारी झाले सुपर सर्वेक्षण रविवारी दुपारी सुरु झालेल्या सर्वेक्षणात ३ तासांत ८५० घरांचे सर्वेक्षण के ल्याचा दावाही के ला. त्यामुळे या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ८५० घरांच्या सर्वेक्षणात ५ जणांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळली आहेत. हे सर्वजण खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनपाने दिली. परदेशातून आलेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयातून तपासणी करून घेण्याचीही सूचना करण्यात आली. त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून आली नाही, तरीही खबरदारी म्हणून त्यांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला.