औरंगाबाद : कोरोना आजाराने मरण पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत राज्य शासनाने नवी नियमावली तयार केली आहे. यामध्ये ४२ मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. मृतदेह घरी न नेता रुग्णालयापासून जवळ असलेल्या स्मशानभूमीत न्यावा, नातेवाईकांनी चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास एक फूट अंतरावरून दाखविण्यात यावा.
कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानंतरच स्मशान परवाना दिला जात आहे. राज्य शासनाने अंत्यविधीच्या वेळी किती जणांनी उपस्थित राहायचे यावर बंधने घातली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी जारी केलेल्या सूचनांमध्ये मृतदेहावरील कपडे नष्ट करावेत किंवा जाळून टाकावेत यासह इतर सूचना प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी काढलेल्या आदेशात केल्या आहेत.
प्रमुख सूचना अशा...- मृतदेह हाताळताना कर्मचाऱ्याने हात निर्जंतुक करावेत. पीपीई कीटचा वापर करावा. - मृतदेहाच्या अंगावरील नळ्या व इतर साधने सुरक्षितरीत्या काढाव्यात. - उपचार करताना शरीरावर तयार झालेली सर्व छिद्रे सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतुक करावीत. अशा प्रकारे पट्टी लावावी की, त्यातून कुठलीही गळती होणार नाही. - मृतदेह पाहण्याची कुटुंबाने इच्छा व्यक्त केल्यास योग्य ती खबरदारी घेऊन एका फुटाच्या अंतरावरून दर्शन द्यावे. - मृत व्यक्तीने वापरलेले कपडे व इतर वस्तू, जैविक घातक कचरा पिशवीत टाकावा. तिचा पृष्ठभाग एक टक्का सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतुक करावा. - नातेवाईकांच्या भावनांचा आदर ठेवून समुपदेशन करावे. - मृतदेह ताब्यात देताना एक मीटरच्या अंतरावरून दाखवावा व त्यांनी वैयक्तिक संरक्षणात्मक साधने घातलेली असावीत. - एखाद्या मृत व्यक्तीचे नातेवाईक उपलब्ध नसतील तर मृतदेह शवागारात ठेवावा. - मृतदेह बांधण्यासाठी नातेवाईकांची मदत घेऊ नये. - विलगीकरण कक्षातून मृतदेह देण्यापूर्वी संबंधित पोलिसांना माहिती कळवावी. - शवागारातील काही बॉक्स कोविड-१९ साठी राखीव ठेवावेत. - मृतदेह शवागारात चार डिग्री सेल्शिअस तापमानात ठेवावा. - मृतदेह नेणारा चालक व त्याच्या मदतनिसाला प्रशिक्षण द्यावे. - नातेवाईकांना चेहऱ्याचे अंतिम दर्शन देण्यासाठी मृतदेहावरील प्लास्टिक बॅग उघडू नये. - धार्मिक पाठ-पठण, मंत्र म्हणणे, पवित्र पाणी शिंपडणे यास परवानगी राहील मात्र दुरूनच. - मृतदेहाला आंघोळ घालणे, मिठी मारणे, यास प्रतिबंध राहील. - अंत्यविधीसाठी उपस्थित नागरिकांनी परस्परांमध्ये एक मीटर अंतर ठेवावे. - अंत्यसंस्कारानंतर प्रत्येकाने हात निर्जंतुक करावेत. - अंत्यसंस्काराच्या वेळी तयार झालेला जैविक कचरा इतरत्र टाकू नये. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. - मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या कुटुंबीय, नातेवाईकांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.